37.3 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeक्रीडा‘आरसीबी’चा २ धावांनी निसटता विजय

‘आरसीबी’चा २ धावांनी निसटता विजय

चेन्नईचा पुन्हा पराभव

बंगळूरू : विराट कोहली, जेकब बेथेल आणि रोमारियो शेफर्ड यांच्या अर्धशतकांनंतर तगड्या गोलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा २ धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ मध्ये आपली यशाची मालिका सुरू ठेवत एका रोमांचक सामन्यात चेन्नईचा पराभव केला.

नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर वाटेला प्रथम फलंदाजी आली. मात्र आरसीबीकडून सलामीला आलेल्या जेकॉब बेथेल आणि विराट कोहली यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी ९७ धावांची भागीदारी केली. जेकॉब ५५ धावा, तर विराट कोहली ६२ धावा करून बाद झाला. हे दोन खेळाडू बाद झाल्यानंतर धावांची गती मात्र मंदावली. देवदत्त पडिक्कल आणि रजत पाटिदार काही खास करू शकले नाहीत. त्यामुळे धावा १७० च्या आसपास होतील असे वाटले होते.

पण रोमारियो शेफर्ड नावाचं वादळ मैदानात घोंघावले. त्याने समोर येईल त्याला धुतला. अवघ्या १४ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकार मारून अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ५ गडी गमवून २१३ धावांपर्यंत मजल मारली. तसेच विजयासाठी २१४ धावांचे आव्हान दिले. हे आव्हान काही चेन्नई सुपर किंग्सला गाठता आले नाही. चेन्नई सुपर किंग्सने २० षटकात ५ गडी गमवून २११ धावा केल्या. आयुष म्हात्रेने ९४ धावांची खेळी केली पण ती व्यर्थ गेली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच आरसीबीने एकाच पर्वात दोनदा चेन्नई सुपर किंग्सला नमवले.

शेवटच्या षटकाचा थरार
शेवटच्या षटकात चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी १५ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी धोनी स्ट्राईकला होता. त्याने एक धाव काढली आणि रवींद्र जडेजाला स्ट्राईक दिली. दुस-या चेंडूवर रवींद्र जडेजान एक धाव घेतली. तिस-या चेंडूवर स्ट्राईकला असलेला धोनी पायचीत झाला. त्यानंतर शिवम दुबे फलंदाजीला आला आणि चौथ्या चेंडूवर त्याने षटकार मारला. पण हा चेंडू कंबरेच्या वर असल्याने दुबेने रिव् ू घेतला. पंचांनी नो बॉल दिला. त्यामुळे तीन चेंडूत सहा धावांची गरज होती. त्यानंतर एक धाव आली. दोन चेंडूत पाच धावांची गरज आणि समोर रवींद्र जडेजा स्ट्राईकला होता. पुन्हा एक धाव आली. शेवटच्या षटकात ४ धावांची गरज होती. स्ट्राईकला दुबे होता. शेवटच्या चेंडूवर १ धाव आली आणि आरसीबीने हा सामना २ धावांनी जिंकला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR