मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मागच्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळतो आहे. काल रात्री राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वा-यांसह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई परिसरातही अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. गारपिटीमुळे काही भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले असून, मार्चपासून अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.
राज्यात एकीकडे उष्णतेचा कडाका वाढतोय, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. काही भागांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुन्हा पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे संकट अद्यापही टळलेले नाही.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाडा भागात वादळी वा-यांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आठ जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता असून, विदर्भातील काही शहरांमध्ये पुढील पाच दिवस पाऊस होणार आहे. यावेळी जोरदार वारेही वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडचिरोली, गोंदिया, अकोला, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर, वाशिम आणि भंडारा या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या भागांमध्ये पुढील तीन दिवस वादळी वा-यांसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये चिंता वाढली असून, राज्यावर काही दिवस अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार आहे.