नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीग २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित केली आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केला. मात्र, युद्धविराम घोषित केल्यानंतर ३ तासातच पाकिस्तानकडून उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे आता आयपीएल स्पर्धा होणार का? यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. असे झाल्यास बीसीसीआयला सर्वात मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. कारण, फक्त एक आठवड्याचा ब्रेक बीसीसीआयचे बरेच मोठे नुकसान होणार आहे.
प्रत्येक आयपीएल सामना टीव्ही डील, तिकिट विक्री, प्रायोजक आणि फूड स्टॉल्समधून पैसे कमविण्यास मदत करतो. रिपोर्ट्सनुसार, रद्द झालेल्या प्रत्येक सामन्यामुळे बीसीसीआयला सुमारे १००-१२५ कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. विमा मिळाल्यानंतरही, बीसीसीआयला प्रत्येक सामन्यात सुमारे ६० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जर या एका आठवड्याच्या ब्रेकमध्ये ५ ते ७ सामने रद्द झाले तर बीसीसीआयला ३००-४२० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. जर ब्रेक वाढवला गेला किंवा संपूर्ण सत्र रद्द केले गेले तर नुकसान आणखी मोठे होऊ शकते.
टाटा सारखे मोठे प्रायोजक आणि जिओहॉटस्टार सारखे ब्रॉडकास्टर्स सध्याच्या ब्रेकवर खूश आहेत. पण, हे जास्त काळ वाढलं तर मात्र त्यांची चिंता वाढू शकते. प्रसारक त्याच्या जाहिरातींच्या पैशाचा काही भाग गमावू शकतो. जो अंदाजे ५,५०० कोटी रुपयांपर्यंत असू शकतो.
आयपीएलच्या १० संघांचेही यात मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. त्यांना बीसीसीआयच्या टीव्ही आणि प्रायोजकांच्या पैशातून काही हिस्सा मिळतो, ज्याला सेंट्रल रेव्हेन्यू पूल म्हणतात. जर आयपीएल रद्द झाले तर नफाही कमी होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सारख्या मोठा चाहता वर्ग असलेल्या संघाचे घरच्या मैदानावरील २ सामने बाकी आहेत. या सामन्यांच्या तिकीटांची आधीच विक्री झाली आहे.
‘आयपीएल’चा थरार १६ मे पासून शक्य…
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे ९ मे रोजी आयपीएलचा १८ वा हंगाम एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर परिस्थिती पाहता येत्या काही दिवसात पुन्हा या स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवार-शनिवारपर्यंत पुन्हा एकदा थरार रंगणार आहे. याबाबत सध्या बीसीसीआयच्या अधिका-यांमध्ये चर्चा सुरु आहेत. तसेच आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल फ्रँचायजींसह संपर्कात आहेत. बीसीसीआय ३० मे रोजी आयपीएल २०२५ मधील अंतिम सामन्याचं आयोजन करु शकते. उर्वरित १६ सामन्यांचे आयोजन हे ३ शहरांमध्ये केले जाऊ शकते. त्यानुसार, चेन्नई, बंगळुरु आणि हैदराबाद या शहरात सामने खेळवण्यात येऊ शकतात. तसेच विशाखापट्टणमचं नावही आघाडीवर आहे. या १८ व्या मोसमातील दुस-या टप्प्याला १६ मे पासून सुरुवात होऊ शकते.