16.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025

ओंजळ

कवयित्री श्रीमती आरती डिंगोरे यांचे पुण्याच्या वैशाली प्रकाशनद्वारे प्रकाशित पहिलेवहिले ‘ओंजळ’ नावाचे काव्यपुष्प नुकतेच वाचण्यात आले. संग्रहाचे मुखपृष्ठ पाहताक्षणी पुस्तक वाचण्यास प्रेरित करते. कवयित्री आपल्या मनोगतात म्हणते, ‘ओंजळी’त आपली सुख-दु:खं सामावतात. मनाच्या तळाशी दडलेले भावभावनांचे कल्लोळ ‘ओंजळी’त सहज पेलता येतात. अहो! अवघे ब्रह्मांड या ‘ओंजळी’त सामावलेले असते; म्हणूनच तर आपण सकाळी उठल्यावर हातांचे दर्शन घेतो. दातृत्वाचे रूप म्हणजे ‘ओंजळ’. आरतीनंतर परमेश्वराचा आशीर्वाद ‘ओंजळी’तूनच घेता येतो. सकाळची सुरुवात दिनकराला ‘ओंजळी’ने अर्घ्य देऊनच होते. माणसाच्या अनेक कृतींशी, भावनांशी ‘ओंजळी’चे घट्ट नाते असते. ‘ओंजळ’ म्हणजे समर्पणाच्या भावनांचं द्योतक. स्वीकारायला ‘ओंजळ’ लागते तसेच द्यायलाही ‘ओंजळ’च लागते. अशी ही ‘ओंजळ’ कधीच रिती राहू नये, मुक्तहस्ते देण्याकरिता पुन्हा पुन्हा भरत रहावी अशी सदिच्छा व्यक्त करतात. त्यांच्या या भावनेतूनच वाचक एक-एक कविता वाचण्यास सुरुवात करतो आणि मंत्रमुग्ध होऊन रचना वाचत राहतो.

कावयित्रीला मूळात लहानपणा-पासून कवितेची आवड होती. अनेक सण, समारंभ किंवा उत्सवांत त्यांचा आणि कवितेचा पावलोपावली संबंध आलेला आहे. त्यातूनच त्यांच्या कविता जन्माला आल्या आहेत असे वाटते. म्हणूनच ते कविता या रचनेत म्हणतात,
जीवनातील प्रीत म्हणजे कविता
जगण्यातील गीत म्हणजे कविता
या काव्यपुष्पामध्ये पाऊस या विषयावर अनेक कविता वाचण्यास मिळतील. श्रावणातला पाऊस असो वा महापूर असलेला पाऊस त्यांना आलेल्या अनुभवावर आधारित रचना मन वेधून घेतात जसे ‘श्रावणसरी’मध्ये त्या म्हणतात-
येता श्रावणाच्या सरी सुवासिनी सजतात,
राऊळांत जाऊनिया
महादेवा पूजतात
आणि तोच पाऊस जेव्हा महापूर होऊन येतो त्यावेळी काय होते ? ‘गंगामाई’ या कवितेत महापुरामुळे लोकांची काय अवस्था झाली याचे वर्णन अस्वस्थ करणारे आहे.
होत्याचं नव्हतं केलं, संसार सारा वाहून नेला, शब्दही झाले नि:शब्द
डोळ्यात आसवे देऊन गेला.
‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असे आईच्या बाबतीत म्हटले जाते. ‘फुलात फूल जाईचे अन् जगात प्रेम आईचे’ असेही बोलल्या जाते. आईवर अनेक मंडळींनी कविता लिहून आईचे प्रेम व्यक्त केले आहे. आईचे आपल्या लेकरांवर खूप प्रेम असते याचे सुंदर वर्णन करताना कवयित्री ‘आई’ कवितेत म्हणते,
आई नेहमीच वेडी असते,
हृदयी तिच्या ममतेची बेडी असते प्रेम याविषयी कविता न करणारा व्यक्ती शोधूनही सापडत नाही. प्रेम या अडीच अक्षरांच्या शब्दामध्ये प्रचंड शक्ती आहे. प्रेम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक प्रियकर आणि प्रेयसी एवढेच चित्र उभे राहते. याशिवाय अन्य ठिकाणी देखील आपणांस प्रेम दिसून येते पण त्यासाठी कवितेची दृष्टी लाभली तर कशी रचना तयार होते हे ‘प्रेम’ कविता वाचताना लक्षात येईल.
प्रेम विशाल आकाशावर, क्षमाशील या धरेवर
हिरव्यागार कुरणावर,
विशुद्ध वाहणा-या निर्झरावर …..
‘बेकार’ या कवितेतून अनेक बेकार बेरोजगार युवकांना प्रेरणा दिली आहे. ‘देवबाप्पा’ आणि ‘चांदोमामा’ या बालकविता देखील वाचनीय आहेत. ‘कळी उमलताना’ ही कविता वाचताना कवयित्रीचे मन वाचायला मिळते. स्त्री आणि मासिक पाळी हा विषय एवढ्या सुरेख पद्धतीने मांडला आहे की, या काव्यपुष्पातील ही सर्वांत सुंदर रचना आहे. कवितेतील शेवटच्या चार ओळींवरून कवितेचा गर्भित अर्थ स्पष्ट होतो.
अचानक तिने मला, भेटायचे नाकारले, जाताना मात्र सृजनतेचे गुपित सांगितले ….

एकूणच ‘ओंजळ’ काव्यपुष्पातील सर्वच रचना खूपच सुंदर, लयबद्ध आणि अनुभवातील प्रसंग मांडणा-या आहेत. पुस्तकाचे शीर्षक असलेली कविता ‘ओंजळ’ मध्ये कवयित्रीने जी इच्छा व्यक्त केली,
कधी न व्हावी रिती ओंजळ
द्यावा एकचि आशिष मज
तव चरणांवर नित समर्पित
जाणून घेण्यास्तव रे तुज ….
म्हणूनच म्हणावे वाटते कवयित्रीची ओंजळ सदा भरून राहावी आणि इतरांना त्या ओंजळीतून उत्तम रचना वाचण्यास मिळाव्या हीच सदिच्छा आणि पुढील काव्यलेखनास हार्दिक शुभेच्छा!
काव्यसंग्रह : ओंजळ
कवयित्री : आरती डिंगोरे, नाशिक
भ्रमणध्वनी : ९४०४६ ८७७२९
प्रकाशक : वैशाली प्रकाशन, पुणे
मूल्य :१५० रुपये, पृष्ठे : १२०

-ना. सा. येवतीकर,
धर्माबाद, मोबा. : ९४२३६ २५७६९

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR