मुंबई : प्रतिनिधी
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ केले. दहशतवाद्यांविरोधातील भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे यशस्वी झाले. या ऑपरेशनची माहिती देशभरात पोहोचवण्यासाठी भाजपाकडून ‘तिरंगा यात्रा’ काढली जात आहे. याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहीले आहे. युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा असे म्हटले आहे.
आपल्या नेतृत्वाखाली देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांवर निर्णायक वाटचाल केली आहे. विशेषत: राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपण घेतलेले कठोर पण आवश्यक निर्णय देशहितासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत, याबद्दल आपले आभार. सध्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जनतेचे लक्ष पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्याकडे केंद्रित झालं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेले धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. भारतीय लष्कराने आपल्या शौर्याने संपूर्ण देशाच्या हृदयात अढळ स्थान मिळवले आहे.
आज देशात प्रत्येक घरातून, चौकात, सोशल मीडियावरून सैनिकांच्या कार्याला सलाम केला जात आहे. सैन्याच्या प्रत्येक हालचालीकडे आज देश प्रेमाने आणि गर्वाने पाहत आहे. त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळेच आपण सुरक्षित आहोत आणि म्हणूनच त्यांचे कार्य कुठल्याही सन्मानापेक्षा मोठे आहे.या पार्श्वभूमीवर, सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून युद्धविराम) आहे. आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत.
या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल, तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं अद्वितीय धैर्य असावं. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा ‘विजय यात्रा’ (मुख्यत्वे राजकीय स्वरूपातील) या समर्पक वाटत नाहीत.
जरी सध्या युद्धविराम जाहीर झाला असला, तरी पाकिस्तानच्या गतइतिहासाचा विचार करता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशाच संधींमध्ये दगाफटका केलेला आहे. म्हणूनच, या पत्राद्वारे एक मनापासूनची विनंती करतो की, युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा. असे अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.