नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने आतापर्यंत २५७ लोक बाधित झाले आहेत. देशाची राजधानी दिल्लीसह ११ राज्ये प्रभावित झाली आहेत. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. कोरोनाची ही नवीन स्ट्रेन कोविड १९ च्या पहिल्या आणि दुस-या म्युटेशन्सइतकी संसर्गजन्य नसू शकते. परंतु इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोविड डॅशबोर्डवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत (२० मे) देशात कोरोनाचे २५७ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये १६४ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तिथे सक्रिय रुग्णांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. यापैकी ६९ प्रकरणं नवीन आहेत. तर तामिळनाडू दुस-या क्रमांकावर आहे. तिथे सध्या ६६ सक्रिय प्रकरणं आहेत. त्यापैकी ३४ रुग्ण नवीन आहेत. यानंतर महाराष्ट्रात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५६ आहे. ज्यामध्ये ४४ नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. नवीन प्रकरणांमध्ये महाराष्ट्र हा तामिळनाडूपेक्षा पुढे आहे.
गुजरातमध्ये कोरोनाचे सात सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी ६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. पुद्दुचेरीमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. तिथं सध्या १० सक्रिय रुग्ण आहेत, तर तीन रुग्ण पूर्णपणे निरोगी असल्याचं घोषित करण्यात आले आहेत. हरियाणामध्येही कोरोनाचा एक नवीन रुग्ण आढळला आहे. देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. यापैकी तीन प्रकरणे नवीन आहेत. आशियाई देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने केंद्र सरकारने १२ मे पासून पुन्हा कोरोना रुग्णांची आकडेवारी अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना देशातील ११ राज्यांमध्ये पसरला आहे. यामध्ये दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल, सिक्कीम, राजस्थान आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.