नवी दिल्ली : देशातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये लवकरच पोटनिवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने त्यासाठी अधिकृत घोषणा केली आहे. गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल राज्यांतील रिक्त जागांवर निवडणुका घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या राज्यांमध्ये काही जागा आमदारांच्या मृत्यूमुळे तसेच राजीनाम्यानंतर रिकाम्या झाल्या आहेत.
गुजरातमध्ये कडी (अनुसूचित जाती) मतदारसंघाचे आमदार कर्सनभाई पंजाभाई सोलंकी यांचे निधन झाले तर विसावदर मतदारसंघाचे आमदार भायाणी भूपेंद्रभाई गांधीभाई यांनी राजीनामा दिला होता. केरळमधील निलांबूर येथे आमदार पी. व्ही. अनवर यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिकामी झाली. पंजाबमधील लुधियाना वेस्ट मतदारसंघाचे आमदार गुरप्रीत बसी गोगी आणि पश्चिम बंगालमधील कालिगंज मतदारसंघाचे आमदार नासिरुद्दीन अहमद यांचे निधन झाल्यामुळे त्या मतदारसंघातही निवडणुका होणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया कधीपासून सुरु?
या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक प्रक्रिया २६ मे रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सुरू होणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख २ जून असून ३ जून रोजी त्याची छाननी होईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ५ जून निश्चित करण्यात आली आहे. मतदान १९ जून रोजी होणार असून मतमोजणी २३ जून रोजी पार पडेल.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. या निवडणुकांमध्ये सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. मतदार ओळखीसाठी ईपिक व्यतिरिक्त आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यासारखी १२ पर्यायी ओळखपत्रे ग्रा धरली जाणार आहेत. सर्व मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. याशिवाय, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी ती जाहीर करणे बंधनकारक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.