मोहोळ : सामाजिक चालीरीतींनुसार वडीलांच्या निधनानंतर मुलच अन्त्यसंस्कार करतात. मात्र कुरूल येथील विकास पाटील यांच्या मुलींनी वडीलांच्या निधनानंतर अन्त्यसंस्कार करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की रयत शिक्षण संस्थेचे तत्कालीन सदस्य, ज्येष्ठ नेते मारुती पाटील यांचे चिरंजीव पंचायत समिती माजी सदस्य विकास पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. स्व. विकास पाटील यांना ६ मुली. संध्या नवनाथ अनपट-भोसले (गार्डी), वृषाली मनोज , स्फूर्ती बाबुराव पाटील पाटील (नरखेड), स्फूर्ती बाबुराव पाटील (ढोक बाभूळगाव), आरती अमोल पवार(मेंढापूर), धनश्री पवन झेंडगे (हिंगणी) आणि क्रांती अशी मुलींची नावे. खरंतर परंपरेनुसार व रीतीरिवाजाप्रमाणे निधन झालेल्या व्यक्तीच्या अन्त्यविधीचा कार्यक्रम करण्याची जबाबदारी पुरुषांच्या खांद्यावर असते. म्हणजे जसे की पाणी पाजणे, अग्नी देणे, तिसरा विधी करणे, दशक्रिया विधी करणे ही पुरुषांचीच कामे. कर्ता पुरुष नसेल तर जावई, नातू, पुतण्या अशा लोकांकडून हा विधी पार पाडला जातो.
मात्र या जुन्या परंपरेला विकास पाटील यांच्या कन्यांनी छेद दिला आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर पाचही मुलींनी आणि त्यांच्या जावयांनी आई सुचेता व वडील विकास पाटील यांना नेहमीच आधार दिला. शेतीच्या कामापासून दवाखान्याच्या आजारापर्यंत कुठेच काही कमी पडू दिले नाही. वडिलांच्या निधनानंतर ६ मुलींनी पाणी पाजले. तर थोरली मुलगी संध्या हिने जड अंतकरणाने वडिलांना अग्नी देऊन समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. मुलींच्या या साहसी निर्णयामुळे उपस्थितां मधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.