मुंबई : विशेष प्रतिनिधी
मुंबईसह देशातील सात प्रमुख शहरांतील गृहनिर्माण क्षेत्रात एकीकडे तेजीचे वातावरण असले तरी दुसरीकडे या सात प्रमुख शहरांत गेल्या पाच वर्षांत घरांच्या किमतींमध्ये सरासरी ४८ टक्के वाढ नोंदली गेली आहे. या सात प्रमुख शहरांत मुंबई शहराने देशातील सर्वांत महागडे शहर अशी ओळख अधोरेखित केली आहे.
मुंबईत सध्या घरांच्या विक्रीचा प्रति चौरस फूट सरासरी दर हा २६ हजार ९७५ रुपये असा उच्चांकी आहे. कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेमध्ये मंदी होती. मात्र, त्याच काळात लोकांना मोठ्या घरांची निकड जाणवू लागली. त्यामुळे अनेकांनी लहान घरांची विक्री करून मोठ्या घरांची अर्थात किमान २ बीएचके, ३ बीएचके किंवा त्यापेक्षा मोठ्या घरांच्या खरेदीला प्राधान्य देण्यात आले. मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने घरांच्या किमती वाढल्याचे दिसून आले. तर, दुसरीकडे मुंबईच्या उपनगरात किमान ५०० पेक्षा जास्त इमारतींच्या पुनर्विकासाचे काम जोमाने सुरू आहे. त्यात बांधकाम साहित्यांच्या दरात देखील वाढ झाली आहे. याचा परिणामही घरांच्या किमती वाढण्याच्या रुपाने दिसून आला आहे.
केवळ घरांच्याच किमती वाढल्या नाहीत तर पुनर्विकासामुळे त्या परिसरातील भाड्याच्या दरात देखील २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. पुनर्विकास होणा-या इमारतींतील लोक त्यांच्या मूळ परिसरात घर घेण्यास प्राधान्य देत असल्यामुळे भाड्याच्या दरात वाढ झाली आहे.
दरम्यान, ज्या सात शहरांत घरांच्या किमतीमध्ये सरासरी ४८ टक्के वाढ झाली आहे, त्यात सर्वाधिक वाढ ही बंगळुरू शहरात झाली असून, येथील घरांच्या किमतींमध्ये सरासरी ७९ टक्के वाढीची नोंद झाली आहे.
अशी झाली वाढ : मुंबई- ४२ टक्के, पुणे- ४५ टक्के,
दिल्ली- ४७ टक्के, हैदराबाद- ४३ टक्के, कोलकात्ता- ६१ टक्के, चेन्नई- २१ टक्के.