अमरावती : प्रतिनिधी
प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. आज अमरावतीच्या टोलनाक्यावर कार्यकर्त्यांनी टायर जाळून घोषणाबाजी देत आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी महामार्गावरच्या दोन्ही बाजूच्या वाहनांना थांबवून ठेवले असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा याठिकाणी लागलेल्या बघायला मिळत आहेत. जोवर बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहील अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
दरम्यान, शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे प्रमुख बच्चू कडू गेल्या ५ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची दखल सरकारकडून गांभीर्याने घेतली जात नसल्याचा आरोप कडू यांनी केला आहे. या उपोषणाच्या चौथ्या दिवशी काल बच्चू कडू यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे.