कैरो : वृत्तसंस्था
खोमेनी राजवटीचा अंत हाच इराणमध्ये आणि मध्य-पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग आहे, अशी प्रतिक्रिया इराणचे निर्वासित राजपुत्र रेझा शाह पहलवी यांनी इराण-इस्रायल संघर्षावर दिली आहे. त्यांनी इराणच्या तीन अणुस्थळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांसाठी इस्लामिक रिपब्लिकच्या आण्विक महत्त्वाकांक्षेला जबाबदार धरले.
इराणच्या तीन अणु केंद्रावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना रेझा शाह पहलवी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, इराणचा आण्विक अट्टाहास आणि अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणी लोकांचे हित धोक्यात आले आहे. खोमेनी आणि त्यांच्या कोसळणा-या दहशतवादी राजवटीने राष्ट्राला अपयशी ठरवले आहे.
कोण आहेत रेझा शाह?
रेझा शाह पहलवी हे शाह मोहम्मद रजा पहलवी यांचे पुत्र आहेत. त्यांनी बराच काळ इराणची सत्ता भोगली होती. १९७९ पर्यंत ते इराणचे प्रमुख होते. परंतु ३७ वर्षांपूर्वी झालेल्या क्रांतीने इराणची धार्मिक-सामाजिक रचना पूर्णपणे बदलून टाकली. त्यानंतर शाह मोहम्मद रझा पहलवी यांना आपला जीव वाचवण्यासाठी इजिप्तला पळून जावे लागले.