तेहरान : वृत्तसंस्था
इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली. आता यावर जगातील विविध देशांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. ब्रिटनने इराणच्या अणुस्थळांवर अमेरिकेच्या हल्ल्यांचे समर्थन करताना म्हटले की, आता इराणने वाटाघाटीच्या टेबलावर यावे. तर, सौदी अरेबियाने म्हटले की अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही इराणमध्ये किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नाही. सौदीने राजनैतिक चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा सल्ला दिला.
संयुक्त राष्ट्रांची चिंता : इराणच्या अणु केंद्रांवर अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यांबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी चिंता व्यक्त केली. निवेदनात म्हटले आहे की, हा संघर्ष वेगाने नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे. याचा नागरिकांसाठी, प्रदेशासाठी आणि जगासाठी विनाशकारी परिणाम होऊ शकतो. मी देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन करतो. यावर कोणताही लष्करी उपाय नाही.
न्यूझीलंडचे चर्चेचे आवाहन : न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांनी रविवारी या संघर्षावर प्रतिक्रिया देताना शांततेत चर्चा करण्याचे आवाहन केले. मात्र, न्यूझीलंडच्या प्रमुखांचे ट्रम्प यांच्या कृतीला पाठिंबा आहे की नाही, हे त्यांनी सांगितले नाही.
ओमानकडून हल्ल्याचा निषेध : ओमानने इराणच्या अणुस्थळांवर अमेरिकेच्या हल्ल्याचा उघडपणे निषेध केला आहे. दरम्यान, इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या अणु चर्चेत ओमान मध्यस्थीची भूमिका बजावत होता. आता ओमानने हा हल्ला चुकीचा असल्याचे सांगत तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.
जे इराकमध्ये तेच इराणमध्ये : चीनच्या सरकारी माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला की, इराकमध्ये जी चूक केली, तीच चूक इराणमध्ये पुन्हा अमेरिका करत आहे का? पश्चिम आशियातील लष्करी हस्तक्षेपाचे अनेकदा अनपेक्षित परिणाम होतात, ज्यात दीर्घकाळ संघर्ष आणि सतत प्रादेशिक अस्थिरतेचा समावेश होतो.
जपान, दक्षिण कोरियात बैठक : जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा हे अणु केंद्रांवरील अमेरिकेच्या हल्ल्याच्या परिणामांवर चर्चा करण्यासाठी प्रमुख मंत्र्यांसोबत बैठक घेत आहेत. तर, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्षही अमेरिकेच्या हल्ल्यांचे सुरक्षा आणि आर्थिक परिणाम आणि दक्षिण कोरियाच्या संभाव्य प्रतिसादावर चर्चा करण्यासाठी आपत्कालीन बैठक घेत आहेत.
राजनैतिक तोडगा-ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा इस्रायल-इराण संघर्षावर राजनैतिक तोडगा काढण्याचा पुरस्कार केला आहे. इराणचा अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोका आहे. आम्ही पुन्हा एकदा तणाव कमी करण्याचे, संवादाचे आणि राजनयिकतेचे आवाहन करतो.