26.6 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रमोर्चाची मोर्चेबांधनी जोरदार

मोर्चाची मोर्चेबांधनी जोरदार

‘ठाकरे ब्रँड’च्या शक्तिप्रदर्शनासाठी मनसे, उद्धवसेनेच्या बैठका हिंदीसक्तीसाठी केंद्राचा दबाव असल्याचा संजय राऊत यांचा आरोप मुंबईसाठी मराठी शक्तींनी एकत्र यावे

मुंबई : प्रतिनिधी
पहिलीपासून अभ्यासक्रमात हिंदी भाषेचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध करण्यासाठी ५ जुलै रोजी उद्धव व राज ठाकरे एकत्र येऊन मोर्चा काढणार असल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर तब्बल १९ वर्षांनी राज ठाकरे आणि शिवसेना ( ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षात प्रचंड उत्साह असून या मोर्चात ठाकरे ब्रँडची ताकद दाखवण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबईसाठी मराठी शक्तींनी एकत्र यावे, अशी जनभावना असल्याचे खा. संजय राऊत म्हणाले.

५ जुलै रोजी सरकारच्या विरोधात काढण्यात येणा-या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा बॅनर असणार नाही. पण या निमित्ताने आपली शक्ती दाखवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न असणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन भाऊ एकत्र येत असल्याने प्रचंड उत्साह असल्याचे सांगितले. कालच आपले शरद पवार यांच्यासोबत देखील बोलणे झाले आहे. त्यांच्या पक्षाने देखील ५ जुलैच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस देखील हिंदी सक्तीच्याविरोधात आहे. काँग्रेसदेखील या ऐतिहासिक मोर्चात सहभागी होईल, तसेच अनेक छोटे पक्ष देखील मोर्चात सहभागी होतील असे संजय राऊत यांनी सांगितले.

हिंदीसक्ती लादून मराठीचा मुडदा पाडण्याचे केंद्राचे धोरण आहे. तसेच, हिंदीसक्ती करण्यामागे केंद्र सरकार आणि आरएसएसचा दबाव आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला. २०२२ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्राच्या आदेशाने रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वात फक्त अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती, मात्र त्यावेळी कोणताही जीआर काढला गेला नाही, हा जीआर फडणवीस यांनीच काढला आहे आणि आम्ही त्याची होळी करणार आहोत असे राऊत यांनी सांगितले.

मराठी शक्तींनी एकत्र यावे
मुंबई पालिका निवडणुकीत एकत्र लढावे अशी आमची इच्छा आहे. हा मोर्चा आटपल्यानंतर मराठी माणसाच्या मनात चांगले वातावरण तयार होईल. मराठी माणसांची एकी तुटणार नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यावे असे संजय राऊत म्हणाले. मुंबईवर मराठी माणसांचा झेंडा फडकवायचा असेल तर बाळासाहेबांचे विचार पाळावे लागतील. मराठी शक्तींनी एकत्र यावे असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

एकत्र यायचे की नाही याचा निर्णय ठाकरे बंधूच घेतील
मोर्चासाठी मतभेद विसरून एकत्र येणारे ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येणार का ? हाच प्रश्न सर्वत्र विचारला जातोय. एका वृत्तवाहिनीला मनसे नेते बाळा नांदगावकर आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी एकत्र मुलाखत दिली. राजकारणातही एकत्र येणार का? असे विचारता, ते एकत्र यावे असे कोणाला वाटत नाही, पण याचा निर्णय तेच घेतील असे सांगितले. मराठी माणसांसाठी एकत्र येण्याची ही सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR