मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. आजपासून विधानसभेमध्ये राजकीय खडाजंगी होताना दिसणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हिंदी भाषेचे दोन्ही शासन आदेश महायुती सरकारने रद्द केले आहेत. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे यंदाचे अधिवेशन हे गाजणार आहे. दरम्यान, यंदाचे पावसाळी अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्या शिवाय जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मागील सात महिन्यांपूर्वी राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीमधील कोणत्याच घटकपक्षाला विरोधी पक्षनेते पदावर दावा करता येईल असे बहुमत मिळालेले नाही. विधानसभेतील २८८ जागांपैकी १० टक्के जागा या विरोधी पक्षातील आहे.
विरोधातील कोणत्याही पक्षातील २९ जागा असल्यास विरोधी पक्षनेते पदावर दावा करता येतो. मात्र ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉंग्रेसकडे संख्याबळ नाही. यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचं घोंगड अजूनही भिजत राहिले आहे.
राज्यामध्ये आता पावसाळी अधिवेशन सुरु झाले तरी देखील विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता मिळालेला नाही. महायुती सरकार स्थापन झाल्यापासून तिसरे अधिवेशन सुरु झाले आहे. यापूर्वी हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. मात्र त्यावेळी देखील विरोधी पक्षनेता नसताना अधिवेशन पार पडले. यंदा देखील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असली तरी विरोधी पक्षनेता हे पद रिक्त आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेसंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय घेऊ शकतात. यामुळे विरोधकांची नार्वेकरांकडे वा-या वाढल्या आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाच्या नेत्यांनी राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. शिवसेनेकडून पक्ष कार्यालय देण्याची मागणी राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते पदाबाबत देखील ठाकरे गटाने अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे मागणी केली का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद देखील ठाकरे गटाकडे आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत.
विरोधी पक्षनेता हा जनतेचे प्रश्न आक्रमकपणे भूमिका मांडून सोड़वण्याचे प्रयत्न करत असतो. सत्ताधारी नेत्यांकडून योग्य निर्णय आणि कामकाज करुन घेण्यासाठी विरोधी पक्षनेता महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अद्याप विरोधी पक्षनेता ठरवण्यात आलेला नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी असे प्रचंड बहुमत मिळाले असल्याने अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.
सुदृढ लोकशाहीसाठी आणि जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्षनेता पद महायुती सरकारने सामंजस्याने हे पद देण्याची आवश्यकता होती. मात्र आता राज्यात सरकार आल्यानंतर हिवाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि आता पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. तरी देखील विरोधी पक्षनेता पद रिक्त राहिले आहे.