25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रमंत्री बावनकुळेंचे भाजपा कार्यकर्त्यांना भावूक पत्र

मंत्री बावनकुळेंचे भाजपा कार्यकर्त्यांना भावूक पत्र

मुंबई : प्रतिनिधी
भाजपा नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाजपा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असून त्यांच्या जागी ही जबाबदारी आता आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, बावनकुळे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना एक भावूक पत्र लिहिले आहे. याद्वारे त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या घटनांकडे लक्ष वेधले आहे.
तसेच कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

बावनकुळे यांनी पत्रात म्हटले आहे की, कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आपले मनापासून आभार. ‘कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे!’ या कविवर्य ना. धों. महानोरांच्या कवितेतील ओळींप्रमाणे माझी भावनिक अवस्था झाली आहे. साधारण ३५ वर्षांपूर्वी कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्याच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली.

भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भिंती रंगवणे, पत्रके वाटणे, गावोगाव कधी सायकलवर, कधी मोटारसायकलवर, तर कधी पायीच प्रवास करणे इथपासून सुरू झालेला माझा प्रवास भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत येऊन पोहोचला, हे माझ्यासाठीच अविश्वसनीय आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की कधीतरी भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आपण काम करू. सामान्यांमधील असामान्य शक्तींना जागृत करणे हीच तर आपल्या पक्षाची किमया आहे. १२ ऑगस्ट २०२२ रोजी जेव्हा मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा आनंद तर होताच पण त्याहून अधिक जबाबदारीचे दडपण होते.

अनेक पिढ्यांनी, अतिशय कष्टाने, रक्ताचे पाणी करून राज्यात हा पक्ष उभा केला, वाढवला आणि त्यातून माझ्यासारखे कित्येक कार्यकर्ते घडले. उत्तमराव पाटील, ना. स. फरांदे, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी जे पद भूषवले, त्या पदाची जबाबदारी स्वीकारणे हे माझ्यासाठी शिवधनुष्य होते. ते शिवधनुष्य समर्थपणे पेलण्याचा मी माझ्या परीने व आपल्या साथीने प्रामाणिक प्रयत्न केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR