बुलडाणा : काही दिवसांपूर्वी एका मुख्याध्यापक पित्याने आपल्या मुलीला कमी गुण मिळाल्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यामध्ये, मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. आता, एका शिक्षकाने भरवर्गात अभ्यासावरील काही प्रश्न विचारले व त्याची उत्तरे न आल्याने विद्यार्थीनीला अपमानित करून विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांवरून अपशब्द उच्चारल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या अपमानाचा मनात राग ठेऊन इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहून गळफास घेतल्याची मन सुन्न करणारी घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली. सर्वत्र हळहळ करणारी ही घटना वाटत असली तरी, या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
बुलडाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील ही घटना आहे. जय हनुमान विद्यालयाची इमारत, काल सकाळी साडेअकरा वाजता याच शाळेत विनायक उर्फ विवेक महादेव राऊत हा दहावीत शिकणारा विद्यार्थी शाळेत आला होता. नेहमीप्रमाणे पहिला तास सुरू झाला, वर्गात वर्गशिक्षक असलेले गोपाल सूर्यवंशी हे शिक्षक शिकवण्यासाठी आले. त्यांनी इतर मुलांसह विनायकलाही काही प्रश्न विचारले. मात्र, विनायकला प्रश्नांची उत्तरे न आल्याने शिक्षकांनी त्याला रागावून तुझ्या आई-वडिलांकडे तुझी तक्रार करावी लागेल, तुला अभ्यासात काही येत नाही असे म्हटले. तसेच, आई-वडिलांवरून काही अपशब्द बोलल्याची माहिती आहे.
त्यावरून विनायकला राग आला व त्याने मधल्या सुट्टीनंतर गावाजवळील त्याच्या शेतातील घरात सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर, तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. विनायकने गळफास घेतल्यानंतर ही बातमी वा-यासारखी परिसरात पोहोचली, गावातील नागरिक शाळेत पोहोचले व त्यांनी शिक्षक गोपाल सूर्यवंशी याला जबाबदार धरत चांगला चोप दिला. शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केलं, विनायकच्या काकांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षक गोपाल सूर्यवंशी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंद केला आहे.
शिक्षकांविरुद्ध गुन्हा, आरोपीला अटक
याबाबत तक्रारदार मुलाचे काका गोपाल राऊत म्हणाले की, आमचा पाल्य विनायक यास शिक्षकाने त्याच्या आई-वडिलांवरून अपशब्द बोलल्यामुळे त्याला अपमान सहन झाला नाही, व त्याने आत्महत्या केली. तर शिक्षक गोपाल सूर्यवंशी यांनी मी फक्त त्याला प्रश्न विचारले असता त्याला उत्तर न आल्यामुळे तुझ्या आई-वडिलांना बोलावून मी तुझी तक्रार करेल इतकच बोललो असे म्हटले. या संपूर्ण घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून बुलडाणा जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत कसे वागावे किंवा १२ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांसोबत किंवा मुलांसोबत कशी वागणूक असावी, याबाबत बाल मानसोपचार तज्ज्ञांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.