नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या रिपोर्टने खळबळ उडाली आहे. मागील दोन वर्षात प्रत्येक भारतीयावरील भांडवली कर्जात प्रचंड वाढ झाली असून, ते ९० हजाराने वाढून ४ लाख ८० हजाराच्या घरात गेले आहे. यावरूनच काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला चढवला. सगळे सरकारी प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा खासगी भागीदारीतून होत आहेत, तर मग देशावर हे कर्ज का वाढत चालले आहे?, असा सवाल काँग्रेसने मोदी सरकारला केला आहे.
कॉँग्रेसचे माध्यम प्रमुख जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारने मागील ११ वर्षाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. लोकांचे आयुष्य सुधारण्याऐवजी फक्त उद्योगपती मित्रांसाठी धोरणे बनवली. त्यातून झालेले नुकसान देशातील जनतेला सोसावे लागत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चिंता वाढवणारे चित्र समोर आले आहे. सरकारकडून आकड्यांचा खेळ आणि तज्ज्ञांची मदत घेऊन मूळ उणीवा लपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही की, देशावरील कर्जाचे ओझे मोदीराजमध्ये उच्चांकी पातळीवर गेले आहे, असे रमेश यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, २ वर्षात प्रत्येक व्यक्तीवरील कर्ज ९० हजारांनी वाढून ४.८ लाख झाले आहे. हातात येणा-या कमाईतील २५.७ टक्के पैसे फक्त कर्ज फेडण्यात चालले आहे. सर्वात जास्त ५५ टक्के कर्ज कथित क्रेडिट कार्ड, मोबाईल ईएमआय याच्यासाठी जात आहे. याचा अर्थ महागाईमुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत नाही आणि कर्ज घेण्याची नामुष्की त्यांच्यावर येत आहे, असे जयराम रमेश म्हणाले.