मुंबई : महायुती सरकारमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार केली जात होती. मात्र आता महायुतीच्या आमदाराची निधी मिळत नसल्याची तक्रार समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी भर सभागृहातच निधी मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली.
हा आमच्यावर दुजाभाव असून आमदार निधीही दिला जात नाही अशी तक्रारही त्यानी सभापतींकडे केली आहे. विधान परिषदेत महत्त्वाच्या विषयावर बोलताना एकही मंत्री आणि अधिकारी उपस्थित रहात नाही असा आरोपही फुके यांनी केला आहे. विधान परिषदेत येऊन चूक केली आहे, अशी खंत ही फुके यांनी व्यक्त केली. यामुळे भाजपप्रणीत महायुतीमध्ये आमदार नाराजीचे सत्र सुरूच आहे.
विधान परिषद आमदारांना हलक्यात घेतले जात आहे. जिल्हा नियोजनात निधी मिळत नाही. मी या सभागृहात येऊन चूक केली, विधानसभा लढवायला हवी होती अशी खंत परिणय फुके यांनी व्यक्त केली. आता आपण आपापल्या पक्षासाठी लढण्याऐवजी सर्वांनी आपल्या अधिकारांसाठी लढले पाहिजे, या सभागृहाच्या सन्मानासाठी बोलले पाहिजे.
सभागृहाने याबाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणी फुके यांनी उपसभापती नीलम गो-हे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, हा विषय गटनेत्यांच्या चर्चेत मांडून सभागृहात यावर चर्चा घेऊ. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामकाजमंत्र्यांशी बोलू, असे आश्वासन उपसभापती गो-हे यांनी दिले आहे.