28.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमनोरंजनअन् डोळ्यांतून अश्रू वाहू लागले

अन् डोळ्यांतून अश्रू वाहू लागले

वारीतून अमित भानुशालीचे मत

पंढरपूर : खासगी वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील अमित भानुशाली नुकताच वारीमध्ये सहभागी झाला. या अनुभूतीविषयी सांगताना तो म्हणाला, वारीचे नाव घेतले तरी अंगावर रोमांच उभे राहतात. कारण पंढरपूरची वारी ही केवळ चालण्याची नाही, ती एका साधकाची, भक्ताची आणि माणसाच्या आत्म्याची यात्रा आहे. ही यात्रा शरीराने चालली जाते, पण पोहोचते ती थेट हृदयाच्या गाभा-यात. या वर्षी मला या वारीचा भाग होण्याचे सौभाग्य मिळाले. त्या अनुभवाने आयुष्यभर पुरेल अशी एक अद्भुत ऊर्जा, भक्ती आणि समाधान दिले.

वारीच्या या प्रवासाची सुरुवात झाली आळंदीहून झ्र तीच आळंदी, जिथे आपले ज्ञानयोगी संत श्री ज्ञानेश्वर माऊली समाधिस्थ आहेत. त्या ठिकाणी पाऊल ठेवताच एक विलक्षण स्पंदन जाणवते. ना ते शब्दात सांगता येते, ना पूर्णपणे समजावता येते. त्या जागेचा प्रत्येक कण, प्रत्येक वारा, प्रत्येक घंटानाद सगळे काही आत्म्याला भिडणारे असते. माझे आणि आळंदीचे नाते फार जुने आहे. लहानपणी दरवर्षी तिथे जायचो. ती माझ्यासाठी दुसरे घरच होती. त्या गल्ल्यांतून अनवाणी फिरणे, ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीसमोर डोके ठेवून बसणे, पाय-यांवर बसून पूजापाठ करणे, प्रदक्षिणा घालणे हे सगळे माझ्या बालपणाचा भाग होते. पण अभिनयाच्या प्रवासात वेगवान धावपळ सुरू झाली आणि आळंदी हळूहळू मागे पडली. एक मोठा काळ गेला. जिथं मी त्या पवित्र भूमीत पाऊलच ठेवू शकलो नाही अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.

यंदा ‘माऊली महाराष्ट्रा’ची कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा वारीचा भाग होता आला तेव्हा पुन्हा आळंदीत पोहोचलो. तेव्हा जे काही जाणवले ते शब्दांपलीकडचे होते. त्या मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच संपूर्ण शरीरात एक विजेसारखी ऊर्जा संचारली. जणू काही माऊली म्हणाली किती वर्षं झाली बाळा, तू आला नाहीस पण मी वाट बघत होते डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यावेळेस मनात नेमकी काय भावना होती ते मलाच समजत नव्हते. हजारो वारकरी माझ्या सभोवती होते, पण माझ्या डोळ्यासमोर फक्त माझा विठोबा होता. तेवढ्या गर्दीतही मला वाटले, विठू माऊली माझ्या शेजारी आहे आणि हलक्या स्वरात माझ्या कानात सांगतेय घाबरू नकोस रे बाळा मी आहे ना, तुझ्या प्रत्येक पावलात, तुझ्या प्रत्येक स्वप्नात. पावसाचा शिडकावा, रस्त्यावर चिखल, पाय पूर्णपणे भिजलेले, शरीर ओले पण त्या क्षणी कोणताही त्रास जाणवत नव्हता. पावले चालत होती, पण थकत नव्हती असा अनुभव अमितन सांगितले.

याविषयी तो पुढे म्हणाला जणू प्रत्येक थेंब विठोबाचे आशीर्वाद बनून अंगावर पडत होता. हातात वीणा, मुखात ‘विठ्ठल विठ्ठल’चा अखंड गजर आणि मन? मन तर अगदीच हरवले होते एका वेगळ्याच विश्वात. जिथे मी आणि फक्त माझा विठोबा होता. वारीत एक गोष्ट ठळकपणे जाणवते, इथे कोणी अभिनेता नाही, कोणी डॉक्टर नाही, कोणी उद्योगपती नाहीङ्घ इथे सगळे फक्त वारकरी! माणसाची खरी ओळख पार विसरतात इथे आणि उरतो तो फक्त ‘भक्त’. वारी चालताना शरीर थकते, पण आत्मा फुलत जातो. त्या भक्तीच्या धुंदीत चालणे म्हणजे जणू देवाच्या मांडीवर बसल्यासारखे वाटते. माझ्या आयुष्यात इतका शुद्ध, निर्मळ आणि प्रेममय अनुभव याआधी कधीच आला नव्हता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR