विधानसभेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा सरकारवर घणाघात
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीत कसे जगावे हा शेतकरी आणि सामान्य माणसांसमोर प्रश्न पडला आहे, असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत म्हटले आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरू आहे. पवनचक्की बसवणा-या कंपनीकडून धाराशिव जिल्ह्यात शेतक-यांना मारहाण होत असून, पोलिस अधिकारीही शेतक-याऐवजी कंपनीच्या लोकांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आज विधानसभेत उपस्थित झाली, तेव्हा शासनाकडे यासंबंधीची कसलीच माहिती उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. या संदर्भाने सुरू असलेल्या चर्चेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सहभाग घेतला. पवनचक्की बसवणा-या कंपनीकडून महाराष्ट्रात शेतक-यांची अडवणूक होत आहे, त्यांना मारहाण होतेय, जे हे सर्व करतायेत त्यांना पोलिस अधिकारी पाठीशी घालत आहेत, यासंबंधी कुठलीच माहिती शासनाकडे उपलब्ध नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे असे नमूद करून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे काय? असा प्रश्न आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित केला.
पवनचक्की कंपनीचे लोक शेतक-यांना मारहाण करीत असतील, पोलिस अधिकारी शेतक-यांना न्याय मिळवून देत नसतील तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट आहे हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शेतकरी आणि सामान्य माणसाला राज्यात कसे जगावे, असा प्रश्न पडला असल्याचेही त्यांनी म्हटले.
शेतक-यांना मारहाणीची माहिती
मंत्र्यांनी सभागृहाला द्यावी
धाराशिव जिल्ह्यात कोणत्या कंपनीच्या लोकांनी शेतक-यांना मारहाण केली, ज्या शेतक-यांना मारहाण झाली, त्यांचे नाव आणि ज्या पोलिस अधिका-याने शेतक-याला न्याय मिळवून दिला नाही, या संदर्भाने संपूर्ण माहिती मागवून घेऊन ती संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी सभागृहात सादर करावी, अशी मागणी यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले.