पंढरपूर : प्रतिनिधी
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पायी वारी सोहळ्याची परंपरा राखत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणा-या दिंड्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी दाम्पत्य श्री. कैलास दामू उगले व श्रीमती कल्पना कैलास उगले यांचा सत्कार करण्यात आला.
देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान पांडुरंगाची पूजा करायला मिळणे, हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो आणि याचे शब्दांत वर्णन अशक्यप्राय आहे. आपल्या वारीची परंपरा कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता अखंडितपणे सुरू आहे. मुघली आक्रमण व इंग्रजांच्या राजवटीतही ही परंपरा अव्याहतपणे सुरू राहिली. सातत्याने या परंपरेत वाढ होत आहे. दिंड्यांसोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. त्यात युवकांची वाढलेली संख्या खूप समाधान देणारी आहे, राज्य शासनाने यावर्षी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. स्वच्छतेमुळे निर्मल वारीसोबत हरित वारी, पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न झाली, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
वारकरी परंपरेत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंगाला पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरिनाम गजर करताना दरवेळी एक नवीन ऊर्जा मिळते. ही आपली संस्कृतीच अलौकिक आहे. विठ्ठल-रखुमाई हे आपले आराध्य दैवत आहे. सर्व वारक-यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी व सन्मार्गाने चालण्याची बुद्धी द्यावी तसेच बळिराजाला सुखी ठेवण्याची शक्तीही द्यावी अशी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस याप्रसंगी म्हणाले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री संजय सावकारे, मंत्री आकाश फुंडकर, पंढरपूर देवस्थान मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे पदाधिकारी, अनेक लोकप्रतिनिधी, इतर मान्यवर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.