वडाळा : उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर वडाळा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात जाऊन सपत्निक विठुरायाची पूजा केली. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणा-या वडाळा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या विकास, सुशोभीकरण आणि सोयी-सुविधांच्या कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
वडाळा येथील विठ्ठल-रखुमाईचे मंदिर हे १६व्या शतकातील मंदिर असून हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. संत तुकाराम महाराजांच्या हस्ते या मंदिरात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. ज्या भाविकांना आषाढी वारीला पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते भाविक वडाळा येथे येऊन विठुरायाचे दर्शन घेतात. आषाढी वारीच्या दिवशी पंढरपूरइतकीच गर्दी आणि उत्साह याही ठिकाणी पहायला मिळतो. आज या प्राचीन मंदिरात विठ्ठलाची पूजा करण्याचे सौभाग्य मिळाल्याबद्दल शिंदे यांनी यावेळी आनंद आणि समाधान व्यक्त केले.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, आमदार कालिदास कोळमकर, आमदार प्रसाद लाड, आमदार मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, शिवसेनेचे सह-मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे, माजी नगरसेवक अमेय घोले आणि महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.