पुणे : प्रतिनिधी
५६ ते ६५ वयोगटातील जालना येथील अंकुश भडंग हे श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेचे मानकरी ठरले, ७० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील परभणी येथील सखाराम नजान यांनी ज्येष्ठ वारकरी महावीर किताब मिळवला, तर १६ ते २५ वयोगटातील धाराशिव येथील प्रकाश धायगुडे हे कुमार वारकरी कुस्ती महावीर किताबाचे मानकरी ठरले.
मानाचा फेटा, माऊली व जगद्गुरूंची प्रतिमा, शाल, स्मृतिचिन्ह, पदक, रोख रक्कम व तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, मावळ, उस्मानाबाद, जालना, औसा, लातूर व कर्नाटक येथील जवळपास ३०० पेक्षा अधिक वारकरी मल्लांनी भाग घेतला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाखरी, पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी, विश्वशांती गुरुकुल परिसरात वारकरी भाविक भक्तांसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यावेळी हिंदकेसरी पै. दीनानाथ सिंग हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच हभप. तुळशीराम दा. कराड, प्रगतिशील शेतकरी काशीराम दा. कराड, महाराष्ट्र केसरी विष्णुतात्या जोशीलकर, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, डॉ. एस. एन. पठाण, शिवम गुरुजी, डॉ. विश्वजित नागरगोजे, वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव प्रा. विलास कथुरे व डॉ. टी. एन. मोरे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिके देण्यात आली. बाबा निम्हण यांनी या स्पर्धेचे धावते समालोचन केले. तर आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच विलास कथुरे, नितीन शिंदे, दत्ता माने, बाबा मते, जितेंद्र कणसे, अमोल नरळे, तानाजी केतरे, निखिल वणवे, राहुल बिराजदार, बाळासाहेब सणस, सुरेश मुंडे आणि नितीन लावंड यांनी कुस्ती पंच म्हणून काम पाहिले.