जयपूर : भारतीय जनता पक्षाने राजस्थानमध्येही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलेले भजनलाल शर्मा यांची राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपने घोषणा केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगानेरमधून भजनलाल शर्मा हे विजयी झाले आहेत. ते पहिल्यांदाच आमदार झाले असून शर्मा हे भाजपच्या संघटनेतील महत्त्वाचा चेहरा मानले जातात. ते पक्षाचे संघटन मंत्रीही राहिले आहेत आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात. ते राजस्थानमधील भरतपूरचे रहिवासी आहेत.
राजनाथ सिंह म्हणाले की, राजस्थान भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ठेवला होता. त्यावर सर्व आमदारांनी एकमताने संमती दिली. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा उपमुख्यमंत्री असतील तर वासुदेव देवनानी हे विधानसभा अध्यक्ष असतील. हे नाव निवडण्यापूर्वी भाजपमध्ये दीर्घ विचारमंथन सुरू होते. वसुंधरा राजेंची मनधरणी करणे हे पक्षापुढील सर्वात मोठे आव्हान होते. त्यासाठी राजनाथ सिंह यांना निरीक्षक करण्यात आले. त्यांच्यासोबत विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना सहनिरीक्षक करण्यात आले. हे तिन्ही नेते मंगळवारी जयपूरला पोहोचले आहेत.
निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून वसुंधरा राजे सिंधिया यांच्यासह अनेकांची नावे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे येत होती, मात्र अनेक आमदारांनी दावा केला होता की, मुख्यमंत्रीपदी एक आश्चर्यकारक नावही येऊ शकते. राजस्थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला १९९ पैकी ११५ जागा मिळाल्या आहेत.