मॉस्को : रशियाने आपल्या नागरिकांवर संपूर्ण प्रवास बंदी लादली आहे. व्लादिमीर पुतिन प्रशासन विशेष गटातील लोकांचे पासपोर्ट जप्त करत आहे. त्यांना त्यांचा पासपोर्ट पाच दिवसांत सरकारला जमा करावा लागणार आहे. रशियात पुढील वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असून व्लादिमीर पुतीन पाचव्यांदा सत्तेच्या शर्यतीत आहेत. पुतिन आपल्या विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी या गोष्टी करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या विरोधकांनी या निर्णयानंतर त्यांच्यावर हा आरोप लावला आहे.
रशियन कायद्यानुसार, फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसचे अधिकारी, कर्मचारी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्ती किंवा देशातील गुपिते किंवा विशेष बाबींची माहिती असलेल्या किंवा त्यासंदर्भातील कामकाज पाहणा-या लोकांचा या गटात समावेश असणार आहे. आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालय किंवा गृह मंत्रालयाकडे जमा करावा लागेल. त्यांचा पासपोर्ट नीट ठेवला जाईल. तसेच लोकांना त्यांचे पासपोर्ट जारी केलेल्या पासपोर्ट कार्यालयात जमा करण्यास सांगितले आहे.
पासपोर्ट परत केव्हा मिळणार?
संबंधित नागरिकांवरील प्रवास बंदी उठल्यानंतर त्यांचे पासपोर्ट परत करता येतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. लष्करी नागरिकांवरही विशेष पहारा ठेवला जाणार आहे. उदाहरणार्थ, ज्या लोकांचा प्रवास करण्याचा अधिकार लष्करी किंवा नागरी सेवेच्या आधारावर आहे, त्यांना अतिरिक्तपणे एक लष्करी ओळखपत्र प्रदान केले जाऊ शकेल. त्यावरून ते त्यांची सेवा पार पाडत असल्याचे स्पष्ट होईल.
रशियाच्या सर्व नागरिकांवर बंदी असणार नाही
या प्रकरणाशी निगडित अज्ञात स्त्रोतांचा हवाला देऊन आधी असे सांगण्यात आले होते की, रशियाच्या सुरक्षा सेवा परदेशात प्रवास टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि राज्य कंपनीच्या अधिका-यांचे पासपोर्ट जप्त करत आहेत. तथापि, हे सर्व रशियन नागरिकांना लागू होणार नाही. हे फक्त अशा लोकांना लागू होईल ज्यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींची माहिती असेल किंवा ते कोणत्याही प्रकरणात दोषी असतील.