गकेबेहरा : दक्षिण आफ्रिकेने दुस-या वनडे सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी करत भारतावर ५ गडी राखून शानदार विजय साकारला. भारताने १९.३ षटकांत १८० धावा केल्या होत्या. पण पावसामुळे खेळ थांबवला गेला आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी डकवर्थ लुईस नियमानुसार १५ षटकांत १५२ धावांचे आव्हान देण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने धमाकेदार सुरुवात केली. जोरदार फटकेबाजीच्या जोरावर द. आफ्रिकेने ५ गडी राखून विजय साकारला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुस-या सामन्यातही अखेरच्या क्षणी अडथळा झाला आणि डकवर्थ लुईस नियमाचा भारताला फटका बसला. प्रथम फलंदाजी करताना भारताची २ बाद ६ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी सूर्यकुमार यादव भारतीय संघाच्या मदतीला धावून आला. त्याने तिलक वर्माच्या साथीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी यावेळी तिस-या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचली. तिलक वर्मा यावेळी २९ चेंडूंवर बाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. त्यानंतर सूर्याने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याने दमदार फटकेबाजी केली.
सूर्याने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत आपले अर्धशतकही साजरे केले. सूर्याला यावेळी रिंकू सिंगची चांगली साथ मिळत होती. कारण रिंकूनेही सुरुवातीपासून धमाकेदार फलंदाजी करायला सुरुवात केली होती. सूर्या आणि रिंकू यांनी चौथ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. फिरकीपटू तारबेझ शम्सीला मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्या बाद झाला आणि ही जोडी फुटली. सूर्याने ३६ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची दमदार खेळी साकारली. त्यानंतर रिंकूने धडाकेबाज अर्धशतक झळकावले. रिंकूने ३९ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६८ धावांची खेळी साकारली. भारताने १८० धावा केल्या असल्या तरी डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १५२ धावांचे टार्गेट देण्यात आले होते.