जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज सकाळी (३१ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अर्धा तास झालेल्या चर्चेत कुणबी प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली.
मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत. नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. जालन्यातील आंदोलनस्थळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरक्षणाबाबत चर्चा झाली. मनोज जरांगे म्हणाले, आपण त्यांना स्पष्टपणे सांगितले, नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा २००४ चा जीआर दुरुस्त करा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत.
समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. ६०-६५ टक्के मराठा समाज अगोदरच ओबीसीमध्ये आहे, आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या. ज्यांचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत. मराठवड्यात कागदपत्रे जमा करा आणि सर्व महराष्ट्राला आरक्षण द्या. विशेष अधिवेशन घ्या, समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून तिला राज्याचा दर्जा द्या.
मराठा समाजाला जरांगेंचे आवाहन
कालपासून मी पाणी पितोय, मी पाणी पिल्यानंतर समाज शांत होणार असेल तर मी पाणी पिणार. मी पुन्हा सांगतो उद्रेक करू नका, आत्महत्या करू नका. खांद्याला खांदा लावून लढा. पाण्यामुळे तब्येत चांगली झालीय, उठून बसलोय. सगळीकडे शांततेत उपोषण सुरू आहे. आमरण उपोषण जसे सहन होईल तसे करा, मात्र साखळी उपोषण सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे.
आमदार, खासदारांनी राजीनामे देणे थांबवावे
राज्यात सुरू असलेल्या राजीनामा सत्रावर मनोज जरांगेंनी भाष्य केले आहे. जरांगे म्हणाले, सर्वांनी मुंबईत जाऊन आवाज उठवा असे म्हटले होते. बहुतेक आमदार मुंबईकडे गेलेत, राजीनामा देण्याचे कळत नाही. सर्व आमदार-खासदार मुंबईतच राहा. राजीनामा दिल्याने काय फायदा होतो कळत नाही पण सर्वांनी मुंबई सोडायची नाही.
‘बंद’चा विचार तूर्तास करू नये
राज्यात मराठा आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. त्याविषयी देखील मनोज जरांगेंनी वक्तव्य केले आहे. मराठा समाजाने संयम राखावा, थोडं टप्प्या टप्प्यात होऊ द्या, ‘बंद’चा विचार तूर्तास करू नये, असे देखील जरांगे यावेळी म्हणाले.