मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या सात दिवसांपासून उपोषण करणा-या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे. मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. आंदोलन उग्र होत असल्याने आंदोलकांच्या आग्रहाने ते पाणी घेणार आहेत. पाणी घेत नसल्याने तब्येत खालावत असल्याने आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगे यांनी हा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगेंच्या आवाहनानंतरही राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत. जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी फोनवरून चर्चा केल्यानंतर थोड्याच वेळात माध्यमांशी बोलण्याचा निर्णय जरांगेंनी घेतला आहे. जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील त्यासंदर्भात पत्रकार परिषदेत तपशील देणार आहेत.
आंदोलन चिघळू नये यासाठी पाणी पिण्याचा निर्णय
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतत तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना समोर येत आहेत. यात अनेक राजकीय नेत्यांची घरे आणि कार्यालये पेटवून देण्यात आली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे होणा-या हिंसक आंदोलनात बघ्याची भूमिका घेऊ नका, तोडफोड आणि नुकसान होत असल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. आंदोलन चिघळू नये यासाठी जरांगे यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे.