खातेअंतर्गत परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासनाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये बंद करण्यात आलेली ही परीक्षा आता पुन्हा सुरू होणार असल्याने मेहनती आणि अनुभवी पोलिस कर्मचा-यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या परीक्षेमुळे कमी वयातच पीएसआय पदावर पदोन्नती मिळून पोलिस दलात तरुण आणि ऊर्जावान अधिकारी दीर्घकाळ कार्यरत राहू शकतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो पोलिस कर्मचा-यांचे करिअर नव्या उमेदीने पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एप्रिल २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. पूर्वी किमान ५ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांना पीएसआय पदासाठी २५ टक्के आरक्षणाच्या अंतर्गत विभागीय परीक्षा देता येत होती. या माध्यमातून अनेक मेहनती व अनुभवी पोलिस कर्मचा-यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळत होती. मात्र, फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा बंद करण्यात आली होती. या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परीक्षा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर शासनाने आज अधिकृत निर्णय घेतला.
खात्यांतर्गत परीक्षेतून
दीर्घकाळ सेवा शक्य
साधारणपणे पोलिस कॉन्स्टेबलना प्रमोशनद्वारे पीएसआय पद मिळते, ते त्यांच्या सेवाकाळ््याच्या शेवटच्या टप्प्यात. अशावेळी त्यांना पीएसआय म्हणून फार तर दोन-तीन वर्षेच काम करता येते. परंतु विभागीय परीक्षेतून पीएसआय झालेल्या अधिका-यांना कमी वयातच पदोन्नती मिळाल्याने त्यांना पुढील २० ते २५ वर्षे पीएसआय तसेच त्यापेक्षा वरिष्ठ पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकते. यामुळे मेहनती, अनुभवी तसेच तरुण पोलिस अंमलदारांसाठी पीएसआयपदाचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे.