नवी दिल्ली : देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक १९ डिसेंबरला दिल्लीत होणार आहे. इंडिया आघाडीची ही बैठक अनेक अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे. पाच राज्यात झालेल्या निवडणुकीनंतर या बैठकीत आता एकत्र वाटचाल करण्याबाबत एकमत होण्याची शक्यता आहे. मुख्य सकारात्मक अजेंडा, जागावाटप आणि संयुक्त रॅलीचे आयोजन याशिवाय माजी मुख्यमंत्री मायावतींच्या बाबतीतही विशेष चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांनी आता लोकसभा निवडणुकीत एकजूट ठेवण्याचा मानस ठेवला आहे. या संदर्भात बसपा प्रमुख मायावती यांना कसे विश्वासात घ्यायचे याचाही विचार व्हायचा आहे. कारण बसपा पुन्हा एकट्याने निवडणूक लढवून उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये विरोधकांची गणिते बिघडू शकते. विशेषत: उत्तर प्रदेशच्या संदर्भात, सपा प्रमुख अखिलेश यादव आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवपाल यादव या दोघांनाही आशा आहे की मायावतींनी आघाडीमध्ये सामील व्हावे. तसेच आघाडीसाठी मुख्य सकारात्मक अजेंडा तयार करणे हे विरोधी पक्षांसमोरचे सर्वात मोठे आव्हान असणार आहेत.