नाशिक : राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक दिवसीय उपोषणाला बसल्या आहेत. नाशिकमधील सौभाग्य नगर भागातील आपल्या संपर्क कार्यालयासमोर त्या उपोषणाला बसल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्या चिमुकल्याला मांडीवर घेऊन अहिरे उपोषण करत आहेत. अहिरेंचे बाळ जेमतेम वर्षभराचे असून त्याचे नाव प्रशंसक आहे.
मराठा आरक्षण व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सरोज अहिरे आपल्या समर्थकांसह एकदिवसीय अन्न व जल त्याग उपोषणासाठी बसल्या आहेत. आरक्षण प्रश्नी उद्या राज्यपाल रमेश बैस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेत विशेष अधिवेशन बोलवण्याबाबत साकडे घालणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले.
अहिरे या नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या आमदार आहेत. सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपले समर्थन दिले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अहिरे सुरुवातीला वेट अँड वॉचच्या भूमिकेत होत्या. शरद पवारांना समर्थन द्यायचे की अजित पवार याबाबत त्यांनी निर्णय लांबणीवर टाकला होता. अखेर त्यांनी अजितदादांना पाठिंबा द्यायचे ठरवले.