मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात ऐन नवरात्रोत्सवात आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नदी, नाले, ओढे, धरणं ओसंडून वाहत आहेत. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वत्र पूरस्थिती उद्भवली आहे.
सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहेच. पण बळिराजाचे मोठे नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक पिके वाहून गेली आहेत. शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातून सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्रात या पावसामुळे शेती पिकाचे कुठे नकसान झाले? नागरिकांना कुठल्या-कुठल्या भागातून रेस्क्यू करण्यात आले? त्याबद्दल जाणून घेऊया.
धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. दोन दिवसांच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज धाराशिव जिल्हा दौ-यावर आहेत. ते भूम-परंडा भागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिवचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या धाराशिव जिल्हा दौ-यावर असून ते नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून अतिवृष्टीग्रस्तांना मदतीच्या साहित्याचे वाटप करणार आहेत.
धाराशिवमध्ये कुठल्या पिकांचे नुकसान?
धाराशिवमधून वाहणा-या दुधना नदी, चांदणी नदी आणि बाणगंगा नदी परिसरातील सोयाबीन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह अन्य पिके वाहून गेली आहेत. भूम तालुक्यातील बेदरवाडी दुधना नदीच्या कडेची सोयाबीन शेती पूर्णपणे नष्ट झाली आहे.
सोलापुरात काय स्थिती?
सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुराची भीषण परिस्थिती पाहायला मिळतेय. सीना नदीत २ लाख क्युसेक वेगाने पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शेतात घुसले. माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये काय स्थिती?
अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शेवगाव शहराशेजारी असलेल्या सूर्यकांता नदीला पूर आला असून शेवगावमधून पैठण आणि गेवराईकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. सूर्यकांता नदीमध्ये वाहून गेला आयशर टेम्पो. रात्री झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. नदीकाठी असलेली शेतीपिके वाहून गेली आहेत. एनडीआरएफ आणि प्रशासनाकडून पाण्यात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.
बुलडाण्यात साचलेल्या पाण्यात आंदोलनाला बसले
बुलडाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतक-याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पैनगंगा नदीवर असलेले येळगाव धरणाचे गेट हे स्वयंचलित असल्याने धरण भरले की हे गेट उघडतात. त्यामुळे पैनगंगा नदीला महापूर येतो आणि नदीकाठी असलेल्या शेतात पाणी जाऊन पिकांचे मोठे नुकसान होते. ते गेट मानवनिर्मित करावे, तसेच नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करत शेतकरी आज सकाळपासून शेतातच साचलेल्या पाण्यात आंदोलनाला बसले आहेत.
















