17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeक्रीडाचमत्काराला नमस्कार!

चमत्काराला नमस्कार!

जगात अफगाणिस्तानची ओळख दहशतवादी, कर्मठ धार्मिक राष्ट्र अशी आहे परंतु या राष्ट्राच्या क्रिकेट संघाने सा-या क्रिकेटपे्रमींचे दिल जिंकले आहे. आता क्रिकेटपे्रमी ‘दिल मांगे मोर’ म्हणत आहेत. हा छोटा संघ फारच लवकर ‘मॅच्युअर’ झाला आहे. या संघाने यंदाच्या स्पर्धेत खरोखरच चमत्कार घडवले आहेत. त्यांनी वर्ल्डकप विजेत्या इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकन संघाला पाणी पाजून चमत्काराची हॅट्ट्रिक साधली आहे. म्हणून त्यांना नमस्कार केलाच पाहिजे. त्यांचे विशेष कौतुक यासाठी की त्यांनी पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवताना लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.

बड्या बड्या संघांनाही ब-याचवेळा असे करणे जमत नाही. मुख्य कोच जोनाथन ट्रॉटने हा संघ चांगला घडवला आहे. अजय जडेजाचे मार्गदर्शनही या संघाला उपयोगी पडले आहे. त्याच्यामुळेच अफगाण संघाला एकेरी-दुहेरी धावा काढण्याचे महत्त्व कळले आहे आणि अशा धावा घेण्यात सुधारणा झाली आहे. दुसरे म्हणजे संघात अजेय जिद्द निर्माण झाली आहे. त्यांनी चेस करताना पाकला आठ विकेट्सनी आणि श्रीलंका संघाला सात विकेट्सनी पराभूत केले आहे. अफगाण संघाला भारतीय प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा मिळाला आहे. अफगाण संघाने टॉस जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजी दिली होती आणि त्यांना २४१ धावांत गुंडाळले होते. श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक गाठता आले नाही यावरून अफगाणी गोलंदाजांची भेदकता लक्षात येते.

एकवेळ श्रीलंकेची ३ बाद १३४ अशी सुस्थिती होती परंतु ३० व्या षटकापासून त्यांची घसरगुंडी सुरू झाली ती थांबलीच नाही. गोलंदाज असलेला तळाचा फलंदाज महिशा तीक्ष्णाने २९ धावा ठोकल्याने श्रीलंकेला २४१ पर्यंत पोहोचता आले. हुकमी लेगस्पीनर राशीद खान महागडा ठरला. त्याने ५० धावा दिल्या. त्याची कसर फजलक फारूकीने भरून काढली. त्याने ३४ धावा देत ४ बळी घेतले. मुजीबने कुसल मेंडीस आणि समर विक्रमा हे दोन महत्त्वाचे बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना फॉर्मात असलेला गुरबाझ शून्यावर परतला. इब्राहिम झद्रानही ३९ धावा काढून बाद झाला. परंतु रहमत आणि शाहिदी जोडी जमली आणि या जोडीनेच ५८ धावांची भागीदारी करत विजयाची मुहूर्तमेढ रोवली.

६२ धावा काढून रहमत बाद झाला पण कर्णधार शाहिदीने पाय रोवले होते. त्याला अझमतुल्लाने सुरेख साथ दिली. शाहिदीने एक बाजू लावून धरली आणि दुस-या बाजूने अझमतने साहसी फटके मारले. काही फटके धोकादायक होते पण साहसाला दैवाची साथ मिळत असते. त्याच्या ६३ चेंडूतील ७३ धावांमुळे लक्ष्य गाठणे सोपे गेले. शाहिदीच्या ७४ चेंडूतील ५८ धावा लाख मोलाच्या होत्या. त्याच्या ५८ धावांत फक्त २ चौकार आणि एक षटकार होता. यावरून त्याने किती जबाबदारीने खेळ केला ते लक्षात येते. छोटे छोटे लक्ष्य गाठत गेले की मोठे लक्ष्य गाठणे सोपे जाते हे अफगाण संघाने दाखवून दिले आहे. अफगाणी प्रेक्षकांत काही राकट चेह-याचे, भरदार मिशांचे ‘शेरखान’ बसले होते. विजय मिळाल्यानंतर त्यांनी दस्त्या फडकावत ‘यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी’ सुरू के ले!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR