31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसंपादकीय विशेषहुंड्याचा राक्षस गाडायचा तर...

हुंड्याचा राक्षस गाडायचा तर…

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या अहवालानुसार गेल्या वर्षी भारतात हुंडाबंदी कायद्यांतर्गत तब्बल १३ हजार ४७९ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. २०२२ सालात हुंडाबळींची संख्या तब्बल ६,४५० होती. यावरून हुंड्याची कुप्रथा आजही समाजातून हद्दपार झालेली नाही हे लक्षात येते. १९६१ साली हुंडाबंदीचा कायदा बनवूनही आज ७० वर्षांनंतर जर या घटना घडत असतील तर ते पूर्णत: कायदाव्यवस्थेचे आणि समाजव्यवस्थेचे अपयश आहे.

मुलाच्या कुटुंबियांनी मागणी केलेल्या हुंड्याची पूर्तता न करता आल्यामुळे केरळच्या तिरुअनंतपूरममधील एका डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अलीकडेच घडली. या तरुणीच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार नव-या मुलाच्या कुटुंबियांनी हुंड्यात १५० ग्रॅम सोनं, १५ एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू कार मागितली होती. मात्र ही मागणी पूर्ण करण्यास मुलीच्या कुटुंबियांनी नकार दिल्याने मुलाने लग्न मोडले. यामुळे तणावात असलेल्या डॉ. शहाना या तरुणीने आत्महत्या केली. वास्तविक, १९६१ मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात आला. त्यानंतर १९८५ मध्ये त्यामध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार हुंडा आणि भेटवस्तूंमध्ये फरक कसा करायचा याबाबतचे बदल केले गेले. त्याचप्रमाणे इतर कायद्यातही याच्याशी पूरक बदल वेळोवेळी करण्यात आले.

१९८६ मध्ये हुंडाबळी हे कलम इंडियन पिनल कोडमध्ये समाविष्ट करण्यात आले. तसेच याबाबत क्रिमिनल प्रोसिजर्समध्ये पोलिसांना अधिकार देण्यात आले. त्यानुसार जेव्हा अशा प्रकारची घडना घडते तेव्हा त्यांनी कोणती पावले उचलली पाहिजेत हे निर्धारित केले गेले. त्याचबरोबर एव्हिडन्स अ‍ॅक्टमध्येही बदल करण्यात आले. या कायद्यांनुसार हुंडा घेणे, हुंडा देणे हा गुन्हा आहे, हे स्पष्ट असूनही अशा स्वरूपाच्या घटना समाजात सर्रास घडत आहेत, हे पूर्णत: आपल्या समाजव्यवस्थेचे आणि कायदा यंत्रणांचे अपयश म्हणावे लागेल. हुंड्याच्या मागणीच्या दबावामुळे मुली आत्महत्या करताहेत ही बाब अत्यंत खेदजनक आहे. हुंड्यासारखी कुप्रथा सुरू राहिल्यामुळे मुलींच्या मनामध्ये आपण कुटुंबावर ओझे असल्याची मानसिकता बळावत जाते, हे लक्षात घेतले पाहिजे. यासंदर्भातील सामाजिक समज हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हुंडा देणारे आणि हुंडा घेणारे या दोघांनाही बहुतेकदा त्याबाबत गैर काही वाटत नाही. मुलीच्या पालकांना आपण इतकं तरी दिलंच पाहिजे असे वाटत असते; तर मुलाच्या पालक-नातेवाईकांना मुलीकडच्यांनी इतकं तरी किमान दिलंच पाहिजे असे वाटत असते.

याचाच अर्थ हा गुन्हा दोन्हीही बाजूंनी केला जात असतो. त्यामुळेच बहुतांश प्रकरणांमध्ये तो उघडकीस येतच नाही. याचाच अर्थ कायद्याने मान्यता नसलेल्या हुंड्याला समाजानेच एक प्रकारे मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राजरोसपणाने यासंदर्भातील देवाणघेवाण सुरू राहते आणि आपल्याला त्यात चुकीचे काहीच वाटत नाही. परंतु जेव्हा केरळमधल्या तरुणीसारखी घटना घडते तेव्हा हुंडा या संकल्पनेतील कटू बाजू भीषणपणाने समाजासमोर येते. केरळची घटना अधिक धक्कादायक असण्याचे कारण म्हणजे यामध्ये मुलगी स्वत: डॉक्टर आहे आणि तिच्याकडे हुंड्याची मागणी करणारा मुलगाही डॉक्टर आहे. वास्तविक, अशा स्थितीत या तथाकथित सुशिक्षित मुलाने हुंड्याची गरज नाही असे म्हणत स्वत:च्या कर्तृत्वाची पोचपावती द्यायला हवी होती. तसेच आम्ही दोघे मिळून दोन्ही घरांना सांभाळू शकतो, असा आत्मविश्वास दाखवायला हवा होता. तसे न करता हुंड्यासाठी तगादा लावणे हा गुन्हा तर आहेच; पण आपल्या कर्तृत्वक्षमतेवर प्रश्चचिन्ह उभा करणारा आहे. शिक्षण-उच्च शिक्षण घेतल्यानंतरही हुंड्यासाठी तगादा लावल्याचे हे पहिलेच उदाहरण नाही. मध्यंतरी हैदराबादमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने कुटुंबियांसह २४ वर्षीय पत्नीचा हुंड्यामुळे छळ केल्याने या महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याच हैदराबादमध्ये पतीच्या कुटुंबियांकडून हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे ३१ वर्षीय महिलेने आत्महत्या केली होती.

हुंड्यासंदर्भात एक पुसट रेषा आहे, ती म्हणजे स्वखुशीने दिलेल्या वस्तू अथवा पैसा. त्याला स्त्रीधन असे म्हटले जाते. पण त्यामुळे हुंडा आणि स्त्रीधन यातील फरक ओळखणे कठीण जाते. वास्तविक, स्त्रीधनाच्या नावाखाली आपण हुंडाच देत आहोत आणि त्यातून किती मोठे ओझे स्वत:वर घेत आहोत याचा विचार मुलीच्या कुटुंबियांनी करण्याची गरज आहे. पण तसा विचार केला जात नसल्यामुळे स्त्रीधनासंदर्भातील कायद्यामध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या. त्यानुसार मुलीला लग्नात ज्या भेटवस्तू दिल्या जातात त्याची यादी केली पाहिजे. ती कोणी दिलेली आहे, तिची साधारण किंमत काय आहे, याची यादी करून नवरा-नवरी या दोघांनी व त्यांच्या कुटुंबियांनी सही केली पाहिजे. त्यामुळे स्त्रीधनाबाबतची स्पष्टता येण्यास मदत होते. यामुळे पुढे जाऊन जर विभक्त होण्याची वेळ आल्यास हे स्त्रीधन परत मिळण्याचा अधिकारही मुलीला राहतो. काही वर्षांपूर्वी लातूरमधील एका मुलीने अशाच प्रकारे आत्महत्या केली होती. तिने लिहिलेल्या पत्रात माझे वडील शेतकरी आहेत आणि ते हुंड्यासाठी पैसे उभे करून माझे लग्न करून देऊ शकत नसल्यामुळे मी आत्महत्या करत आहे असे म्हटले होते. वास्तविक, त्या मुलीला तुला हुंडा घेणा-या मुलाशी लग्न करायचे आहे की नाही हे विचारण्याची गरजही वडिलांना वाटली नाही. वास्तविक, मुली सक्षम आणि कार्यक्षम असतात; पण हुंड्यासारख्या घटनांमुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळतो. आपण मुलींना शिक्षण देतो; पण जीवनप्रवासातील अडथळ्यांचा सामना करण्यासाठी आणि अडचणीच्या काळात खंबीर बनण्यासाठीचे शिक्षण कुठेच उपलब्ध नाही.

-अ‍ॅड. रमा सरोदे,
कायदेतज्ज्ञ

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR