24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा आंदोलनाचा भडका ; ८० पेक्षा जास्त एसटी फोडल्या

मराठा आंदोलनाचा भडका ; ८० पेक्षा जास्त एसटी फोडल्या

- ३६ आगारांची वाहतूक पूर्ण बंद - एक कोटीचे नुकसान

मुंबई : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांतील एसटी बसच्या फे-या रद्द करण्यात आल्या आहेत. आज पर्यंत आंदोलनामध्ये ८० पेक्षा जास्त एसटी फोडल्या असून सोलापूर विभागातील सर्व एसटी आगारांची वाहतूक पूर्ण बंद आहे. तर बुलडाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणा-या ७० हून अधिक बसफे-या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणा-या सर्व बसफे-या आजपासून रद्द केल्या आहेत. याशिवाय संभाजीनगरमध्ये सोमवारी दुपारपासून बससेवा ठप्प आहे. खबरदारीचा उपाय म्हणून १४०० रोजच्या फे-या रद्द करण्यात आल्या आहेत. १६० बसेस मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या आहेत.

राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची झळ एसटी बसेसला बसत आहे. पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांतून मराठवाड्याकडे जाणा-या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे लालपरीची सेवा ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या नवीन स्लीपर बसेस परत बोलवण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरहून निघणा-या आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये येणा-या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणा-या ७० बसफे-या रद्द
बुलडाणा जिल्ह्यातील विविध आगारांतून ७० पेक्षा जास्त बसफे-या या मराठवाड्यात होत असतात. मात्र परिवहन महामंडळाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणा-या सर्व बसफे-या आजपासून रद्द केल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असून प्रवाशांचे देखील हाल होणार आहेत.

बीडमध्ये ७० बस फोडल्या
आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर हा जमाव बीडमध्ये बस स्थानकामध्ये पोहोचला. यावेळी बस स्टँडमध्ये ७० पेक्षा जास्त एसटी उभ्या होत्या. जमावाने या सगळ्या बस फोडल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR