काशी : पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी दौ-यावर आहेत. पीएम मोदी यांच्या भाषणावेळी पहिल्यांदाच एआय या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. रविवारी त्यांनी सभेला जमलेल्या तमिळ जनतेशी भसिनी या अनुवाद प्रणालीद्वारे थेट संवाद साधला. मोदींनी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी या दोन दिवसीय दौ-याच्या पहिल्या दिवशी दुस-या काशी-तमिळ संगम कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांचे हिंदीतील भाषण तमिळमध्ये एआयद्वारे पहिल्यांदाच ट्रान्सलेट केले.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी तामिळ जनतेला इअरफोन लावण्याची विनंती केली. मोदी म्हणाले, हर हर महादेव! वनक्कम काशी. वनक्कम तामिळनाडू. जे तामिळनाडूहून आले आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पहिल्यांदा एआय तंत्रज्ञान वापरताना इअरफोन लावा. पीएम मोदी म्हणाले हे ठीक आहे का? तामिळनाडूच्या मित्रांनो, हे ठीक आहे का? तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल का? माझा पहिलाच अनुभव आहे. मी भविष्यात ते वापरेन. तुम्ही मला अभिप्राय द्यावा. आता मी हिंदीत बोलेन, मला तामिळमध्ये उत्तर द्यायला मदत होईल.
भाषिणी काय आहे?
भाषिणी ही एक एआय आधारित भाषांतर प्रणाली आहे, याद्वारे एखादी व्यक्ती स्वत:च्या भाषेत बोलू शकते, पण श्रोत्याला ते भारतातील इतर भाषांमध्ये देखील समजू शकते. हे अँडरॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. या अॅपमध्ये भाषादान नावाची सुविधा देखील आहे, याद्वारे वापरकर्ता देखील सिस्टममध्ये योगदान देऊ शकतो.