कोलकाता : विश्वचषकाच्या ३० व्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला २०५ धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ४५.१ षटकांत सर्वबाद २०४ धावा केल्या. महमुदुल्लाह रियादने ७० चेंडूत ५६ धावा केल्या. लिटन दासने ६४ चेंडूत ४५ तर कर्णधार शाकिब अल हसनने ६४ चेंडूत ४३ धावा केल्या.
पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदी आणि वसीम ज्युनियरने प्रत्येकी ३ बळी घेतले. हरिस रौफने २ बळी घेतले. इफ्तिखार अहमद आणि उसामा मीर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. पॉवरप्लेमध्ये खराब सुरुवातीनंतर लिटन दासने महमुदुल्लाह रियादसह बांगलादेशच्या विस्कळीत डावाचा ताबा घेतला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८९ चेंडूत ७९ धावांची भागीदारी केली. ३० षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या १२८/४ होती. संघाने ११ व्या ते ३० व्या षटकापर्यंत २० षटकांत एक गडी गमावून ९१ धावा केल्या. महमुदुल्लाह रियादने त्याच्या वनडे कारकिर्दीतील २८ वे अर्धशतक झळकावले. त्याने ७० चेंडूत ५६ धावांची खेळी खेळली.
रियादने ८०.०० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकारांचा समावेश होता. दरम्यान लिटन दास आणि महमुदुल्लाह यांच्यात चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. दोघांनी ८९ चेंडूत ७९ धावा जोडल्या. ही भागीदारी इफ्तिखार अहमदने लिटन दासची विकेट घेत तोडली. लिटन दास ४५ धावा करून बाद झाला. या सामन्यात बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांनी सतत दबाव कायम ठेवला. पॉवरप्लेमध्ये बांगलादेश संघाने तीन गडी गमावून केवळ ३७ धावा केल्या. तंजिद हसन शून्यावर होता. नजमुल हुसेन शांतो ४ धावा करून बाद झाला. या दोघांशिवाय मुशफिकर रहीमही ५ धावा करून बाद झाला. या विश्वचषकात पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. संघाने पहिल्या सामन्यात नेदरलँडचा ८१ धावांनी तर दुस-या सामन्यात श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला. पण, जसजशी स्पर्धा पुढे सरकत गेली, तसतशी संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होत गेली.
आफ्रिदीचे सर्वात जलद १०० बळी
शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी घेणारा पाकिस्तानी गोलंदाज ठरला आहे. त्याने ५१ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. सकलेन मुश्ताक (५३ सामने) दुस-या स्थानावर आणि वकार युनूस (५८ सामने) तिस-या स्थानावर आहे.