ढाका : बांगलादेशातील गारमेंट कारखान्यांमध्ये काम करणारे हजारो कामगार आंदोलन करत आहेत. हे कामगार पाश्चात्य देशांतील प्रमुख ब्रँडसाठी कपडे बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करतात. आंदोलक कामगारांनी पगारवाढीच्या मागणीसाठी राजधानी ढाकामध्ये रस्ते अडवले. तेथील कापड कारखान्यांची तोडफोड झाल्याच्या बातम्याही येत आहेत. तसेच सोमवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.
ढाक्याच्या बाहेरील औद्योगिक परिसरात जमलेल्या आंदोलक कामगारांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. गगनाला भिडलेल्या महागाईमुळे कामगारांना नीट जगता येत नसल्याने कामगार संपावर गेल्याचे कामगार संघटनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. बांगलादेशातील या कपड्यांच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा सरासरी मासिक पगार सुमारे ७५ डॉलर आहे. कामगार संघटनांना हे किमान वेतन २०८ डॉलरपर्यंत वाढवायचे आहे.