32.3 C
Latur
Monday, March 16, 2026
Homeमहाराष्ट्रस्कूल बॅगमध्ये आढळले नवजात अर्भक; आरोपी पालकांचा शोध सुरू

स्कूल बॅगमध्ये आढळले नवजात अर्भक; आरोपी पालकांचा शोध सुरू

भंडारा : प्रतिनिधी
माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मानेगाव (सडक) येथे समोर आली आहे. एका अज्ञात निर्दयी मातेने किंवा पालकांनी आपल्या अवघ्या ८ ते १० दिवसांच्या मुलीला एका स्कूल बॅगमध्ये भरून नाल्याच्या काठावर बेवारस सोडून दिले. सुदैवाने, हे बाळ जिवंत असून सध्या सुरक्षित आहे.

मानेगाव (सडक) परिसरातील उद्घजित पाल सिंग भाटिया यांच्या शेतशिवारातून जाणा-या नाल्याजवळ स्थानिकांना एक काळ्या रंगाची स्कूल बॅग पडलेली दिसली. संशय आल्याने जवळ जाऊन पाहिले असता, त्या बॅगमध्ये एक जिवंत नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. कडाक्याच्या थंडीत आणि निर्जन स्थळी या बाळाला मरणाच्या दारात सोडून देण्यात आले होते.

या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव सडक येथील पोलिस पाटील सुरेश मते यांनी विलंब न लावता लाखनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक सुभाष बारसे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले आणि बाळाला ताब्यात घेतले. पोलिसांनी तातडीने बाळाला लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, बाळाला पुढील देखभालीसाठी आणि उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, बाळ साधारण ८ ते १० दिवसांचे असून सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR