धाराशिव : प्रतिनिधी
एसटी बस का थांबवली, या कारणावरून शिराढोण ता. कळंब येथील दोघांनी एसटी बसचालकाला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना मंगळवारी दि. १९ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास शिराढोण ते कोल्हेगाव रस्त्यावर हासेगाव शिवारात घडली. या प्रकरणी बसचालक सुभाष कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाणे येथे दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब आगारातील बसचालक सुभाष श्रीरंग कानडे हे बस घेऊन शिराढोण येथे गेले होते. त्यांची बस शिराढोण ते कोल्हेगाव रस्त्यावर हासेगाव शिवारात आली होती. त्यावेळी आरोपी किशोर जगदीश मुंदडा, अविनाश महाजन रा. रा. शिराढोण यांनी हासेगाव पाटी येथे बसचालक सुभाष कानडे यांना त्यांची फोरव्हिलर आडवी लावून तु बस येथे का थांबविली, असे म्हणून गच्छीला धरुन शिवीगाळ केली.
जिवे ठार मारण्याची धमकी दिली. बसचालक हे सरकारी काम करत असताना सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी सुभाष कानडे यांनी दि.१९ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पोलीस ठाणे येथे कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.