इंफाळ/नवी दिल्ली : मंगळवार ३१ ऑक्टोबर रोजी मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह भागात एका पोलिस अधिका-यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मोरेहचे एसडीओपी चिंगथम आनंद कुमार कुकी-जो समाजाचा प्रभाव असलेल्या भागाला भेट देत होते.
पोलिसांनी सांगितले की, एसडीओपी आनंद कुमार हे हेलिपॅडसाठी जमीन साफ करण्याच्या कामावर देखरेख करण्यासाठी बॉर्डर टाउनमधील एका शाळेत गेले होते. राज्य दल आणि बीएसएफचे जवानही त्यांच्यासोबत होते. दरम्यान, कुकी अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी लागल्यानंतर एसडीओपींना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. खरं तर, मोरेह येथील काही नागरी संस्था अनेक आठवड्यांपासून सीमावर्ती भागातून सुरक्षा दलांना हटवण्याची मागणी करत होते. यानंतर अशी घटना समोर आली आहे. दरम्यान, शुक्रवारला सार्वजनिक सुटी जाहीर करणा-या संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.