लातूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाची आता तिव्रता वाढली आहे. लातूर जिल्ह्यात दि. ३१ ऑक्टोेबर रोजी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. महामार्गावर चक्का जाम करण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. गरुड चौक ते कन्हेरी चौकापर्यंतचा महामार्ग वाहतूकीस बंद होता. सुमारे ३ ते ४ किलो मीटरपर्यंत दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा होत्या. वाहतूक ठप्प झाल्याने लातूर जिल्हा जाम झाला आहे.
जिल्हाभर आंदोलनाने तिव्र स्वरुप धारण केल्याचे निदर्शनास आले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नांदेड रोडवरील गरुड चौकात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोकोे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे नांदेड, अहमदपूर, चाकुर, जळकोट, उदगीर, देवणी आदी भागातून येणा-या वाहनांना लातूर शहरात नो-एन्ट्री होती. परिणामी दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गरुड चौक ते कन्हेरी चौक या मार्गावर टायर जाळून आंदोलन करण्यात आले. त्यामुळे हा संपूर्ण मार्ग वाहतूकीसाठी बंद झाला होता. रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मराठा आरक्षण आंदोलनाची धग जिल्हाभरात तीव्र झाली आहे. शहरातही त्याचे पडसाद उमटले. मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील गरुड चौक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक, नवीन रेणापूर नाका, साखरा पाटी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी राज्या शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती. दरम्यान मराठा विद्यार्थ्यांनी दयानंद महाविद्यालयापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरु असलेल्या आमरण उपोषणस्थळापर्यंत रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बैठक घेऊन मराठा आरक्षणासाठी प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.