31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरभावी डॉक्टरांनी मांडल्या मराठा समाजाच्या व्यथा

भावी डॉक्टरांनी मांडल्या मराठा समाजाच्या व्यथा

लातूर : प्रतिनिधी
मराठा समाज बिकट आर्थिक परिस्थितीने हतबल झाला आहे. गुणवत्ता असूनही पैसा नसल्याने अनेकांना शिक्षण घेणे कठीण बनले आहे. ही आर्थिक अन मानसिक कुचंबना त्याच्या जीवावर उठत आहे. हे टाळण्यासाठी आणि त्यांच्या जगण्यात नवी उमेद जागवण्यासाठी आरक्षण अन आरक्षणच हा समर्थ पर्याय असून सरकारने या वास्तवाचा स्वीकार करीत कसल्याही कसोट्या न लावता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ‘मराठा मेडीको’ अर्थात मराठा समाजातील भावी डॉक्टरांनी केली. या लढ्यास आपला पाठींबाही त्यांनी यावेळी जाहीर केला.

सोमवारी सायंकाळी गणवेशात मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेत असलेले शेकडो विद्यार्थी मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपिठावर आले व त्यांनी उपोषणकर्ते व समाजबांधवाशी संवाद साधत आपल्या भावनांना वाट करुन दिली. प्रातिनिधीक रुपात डॉ. शिवानी सूर्यवंशी या विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली मराठा समाजाचे हाल होत आहेत. हेक्टरातील शेती काही एकरात आली आहे आता ती गुंठयावरही येईल. शिवाय नैसर्गिक आपत्तीने उत्पादन घटले आहे. उच्च शिक्षण घेण्याची योग्यता असुनही अडचणींचे डोंगर कसे पार करावयाचे ? हा प्रश्न मराठा पालक अन विद्यार्थ्यांना सतावत आहे. सहनशिलतेचा कडेलोट व्हावा अशी परिस्थिती त्यांच्या वाट्याला आली आहे. हे सारे सूर्यप्रकाशाइतके सत्य असताना आणखी कसले पुरावे सरकारला हवे आहेत? असा सवाल तिने केला व मराठा समाजाला आरक्षण देणे किती अनिवार्य आहे हेही पटवून सांगितले. सर्वच विद्यार्थ्यांनी एकमुखी आरक्षणाची मागणी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR