23.2 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeराष्ट्रीयवैद्यकीय निष्काळजीपणा आता गुन्हेगारी कलमाबाहेर!

वैद्यकीय निष्काळजीपणा आता गुन्हेगारी कलमाबाहेर!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या डॉक्टरने निष्काळजीपणा केला आणि त्यामुळे जर रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या डॉक्टरवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अ नुसार गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. या बाबींकडे डॉक्टरांच्या संघटनांनी अनेकदा सरकारचे लक्ष वेधले. तसेच या कायद्यात बदल करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. मात्र, आतापर्यंत त्याकडे लक्ष दिले गेले नव्हते. परंतु आता केंद्र सरकारने या कायद्यात बदल करून या कलमातून वैद्यकीय व्यावसायिकाना वगळण्याचा आदेश दिला आहे. परंतु यात नेमका काय बदल होणार, हे स्पष्टपणे सांगितले गेले नाही.

एखाद्या डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला तर संबंधितांवर गुन्हेगारी स्वरूपाच्या कलम ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला जात होता. यावर विचार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने ३० नोव्हेंबर रोजी सरकारला पत्र देऊन याकडे लक्ष वेधले होते. तसेच या कायद्यात बदल करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत माहिती देत प्रचलित कायद्यात नवीन बदल करून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जर मृत्यू झाला तर त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा ३०४ अ या कलमातून वगळण्यात येणार असून त्यात नवीन बदल करण्यात आला असल्याची माहिती दिली.

शाह यांनी संसदेत दिलेल्या माहितीमुळे नक्की नवीन बदल काय, तो नेमका कसा असेल? याबाबत अद्यापही स्पष्टोक्ती मिळालेली नाही. मात्र तरीही देशभरात या निर्णयाचे डॉक्टरांच्या संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकोज, फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन या सर्व संघटनांनी स्वागत केले आहे. जर या कायद्यात सरकारने काही बदल केले आणि यातून जर डॉक्टरांना सवलत मिळाली, तर न्याय वैद्यक क्षेत्रात काम करणा-या काही तज्ज्ञांना काही भीती वाटत आहे, तर काही मुद्दे डॉक्टरांसाठी चांगले असल्याचे न्याय वैद्यक तज्ज्ञ सांगत आहेत.

…तर डॉक्टर सहज हात झटकतील
जर ३०४ अ मधून डॉक्टरांना दिलासा मिळाला तर डॉक्टरांचा निष्काळजीपणा काढल्यास त्यांना कायद्याचे अभय राहील. मात्र, धोका हा आहे की, रुग्णाचे काहीही झाले तरी माझे काही होऊ शकत नाही, ही भावना वाढीस लागेल. ख-या निष्काळजीपणामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याला न्याय मिळणार नाही आणि नातेवाईकांचा व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही. तसेच रुग्णालय प्रशासान किंवा स्टाफ काळजी घेईलच, याची शाश्वती राहणार नाही.

बोगस वैद्यकीय व्यवसाय बळावेल?
या कायद्यात बदल केल्यास अ‍ॅलोपाथीसोबत होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी डॉक्टर्सही गैरफायदा घेऊ शकतात. खेड्यापाड्यातील बोगस वैद्यकीय व्यवसाय बळावेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

डॉक्टरांना अभय
डॉक्टरांना संरक्षण मिळाल्यास ते उपचार करण्यात दिरंगाई करणार नाहीत, असे सांगतानाच मानसिक ताणही होणार नाही. गैरसमजातून डॉक्टर आणि रुग्ण यातील संघर्ष होणार नाहीत. दरम्यान, डॉक्टरांना अभय मिळाल्यास रुग्ण कल्याण समिती आणि सामान्य रुग्णांमधून नाराजी व्यक्त होत असून, रुग्ण कल्याण समितीने याबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे संकेत दिले आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR