रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पातून रेणापूर पानगाव व अन्य तीन गावाच्या योजनेचा पाणी पुरवठा केला जातो मात्र मागील पाच वर्षांहून अधिक कालावधीपासून या योजनाची १ कोटी ७२ लाख ८१ हजार रुपयाची पाणीपट्टी थकल्याने जलसंपदा विभागाने गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सदरील गावांचा प्रकल्पातून होणारा पाणी पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभी रेणापूरकरांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे .
भंडारवाडी (ता. रेणापूर) येथील रेणा मध्यम प्रकल्पातून रेणापूर शहरासह पानगाव १० खेडी , पट्टीवडगाव १० खेडी तर बिटरगाव ५ खेडी या योजनाना पाणी पुरवठा केला जातो मात्र मागील ५ वर्षापासून जलसंपदा विभागाची रेणापूर नगरपंचायत व ग्रामपंचायतीने नियमीत पाणीपट्टी भरणा केला नसल्याने रेणापूर नगरपंचायत ४० लाख ५६ हजार रुपये, पानगाव १ कोटी १ लाख ५ हजार रुपये ,पट्टीवडगाव ४ लाख ४९ हजार रुपये तर बिटरगाव या योजनेची २६ लाख २६ हजार रुपये, अशी एकूण १ कोटी ७२ लाख ८१ हजार रुपयांची थकबाकी असल्याने संबंधीत नगरपंचायत व ग्रामपंचायतीस थकीत पाणीपट्टीचा भरणा करावा असे लेखी स्वरूपात तीन वेळा नोटीसा दिल्या होत्या मात्र संबंधितांनी पाणीपट्टीचा भरणा न केल्याने लघु पाठबंधारे विभाग २ चे उपविभागीय अभियंता डी. डी. मुंगे , शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी, अरीफ शेख, डहाळे यांनी गुरुवारी दि. २६ फेब्रुवारी रोजी सदरील योजनेंतर्गत पाणी पुरवठा करणा-या पंप हाऊसला टाळे ठोकून सिल बंद करून पाणी पुरवठा बंद केला आहे. अशी माहिती शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली आहे. रेणापूर, पानगाव व अन्य दोन योजनाचा पाणी पुरवठा बंद झाल्याने उन्हाळ्याच्या सलामीलाच नागरीकावर पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे तेव्हा नगरपंचायत व संबंधीत ग्रामपंचायतीने पाणीपट्टीचा भरणा करून पाणीपुरवठा सुरळीत सुरू करावा अशी मागणी नागरीकातून होत आहे.

