मुंबई : प्रतिनिधी
भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याने महिलांवर केलेल्या अत्याचाराची संताप आणणारी माहिती विधानसभेत देताना, या प्रकरणातल्या कोणालाही सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खरातच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. मुंबईतील फॉरेन्सिक लॅबमध्ये त्याच्या मोबाईलमधील डिलिट केलेला डेटाही काढण्यात येणार आहे. या प्रकरणी कोणालाही पाठिशी घालणार नाही. ज्या-ज्या व्यक्तीच्या विरोधात पुरावा मिळेल त्याची चौकशी करण्यात येईल.
वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांचे त्याच्याशी संगनमत होते का याचीही चौकशी सुरू आहे. कोणालाही पाठिशी घालणार नाही. जर कोणी त्याला मदत केली असेल तर त्यालाही आपण धडा शिकवू असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करताना भोंदूबाबा खरातच्या काळया कारनाम्यांची जंत्रीच वाचून दाखविली. खरातच्या शिर्डी, नाशिक, सिन्नर, पुणे, पनवेल आदी ठिकाणच्या डोळे दिपवणा-या प्रॉपर्टीचीही माहिती दिली. खरातवर आधीपासूनच पाश आवळायला सुरूवात केल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा त्याच्या विरोधात शिर्डीत तक्रार दाखल करण्यात आली. खरात देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती म्हणून पोलिसांनी लूक आऊट सर्क्युलर १० मार्च रोजीच जारी केला व त्याच्या परदेशगमनास बंदी घातली. १३ मार्च रोजी एसआयटीची स्थापना केली. एसआयटीचे प्रमुख एका महिला अधिका-याला केले, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. पहिल्यांदा महिला तक्रारीसाठी पुढे येत नव्हत्या. त्यांचे समुपदेशन करून तक्रार देण्यास तयार केले.
सहा पीडित महिलांना निष्पन्न करून पाच महिलांवरून पाच व एक साक्षीदाराच्या पत्नीबाबत एक गुन्हा असे सहा गुन्हे धरून आजपावेतो आठ गुन्हे खरात विरोधात दाखल करण्यात आले आहेत. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांचे संगनमत आहे का याचेही संगनमत असल्याचा सखोल तपास सुरू आहे. एसआयटीकडे साक्षीदाराला संरक्षणाची हमी देण्यात आली आहे असेही ते म्हणाले.
रुपाली चाकणकरांची चौकशी होणार
अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांची चौकशी होणार असून नाशिक पोलिसांकडून शिवनिका स्ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी होणार असल्याने या र्ट्स्टमध्ये रुपाली चाकणकर या देखील सदस्य असल्यामुळे आता त्यांची देखील नाशिक पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान यावेळी बोलताना खरात याच्या संपर्कात असलेल्या राजकीय नेत्यांची देखील चौकशी होणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
खरातच्या मोबाईल मधील डेटा काढणे सुरू
भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमधील डेटाचे क्लोनिंग करण्याचे काम सुरू आहे. त्याचा मोबाईल नंतर मुंबईतील फॉरेन्सिक लॅबमध्येही पाठविण्यात येणार असून त्यातून डिलिट केलेला डेटाही रिट्रिव्ह करण्यात येणार आहे. समाजमाध्यमांवर पीडित महिलांचे व्हायरल झालेले व्हीडीओ स्ट्रकडाऊन करण्याचे काम देखील सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
गर्भवती महिलेवरही केला होता अत्याचार
खरातने कोपाची भीती दाखवत गरोदर बाईवर देखील बलात्कार केला. नकली साप, नकली वाघ दाखवून भीती घातली. लघवी पाजून अघोरी प्रकार केले. फिर्यादी महिलेस दिवस गेल्याने गोळया देऊन गर्भपातही केला होता. पीडित महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध दिले होते. खरात जे द्रव्य दयायचा त्या द्रव्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
खरातची डोळे दिपवणारी प्रॉपर्टी
खरातची नाशिक, सिन्नर, पुणे, नवी मुंबई आदी ठिकाणी प्लॉट, बंगले, मंगल कार्यालय आदी असलेल्या प्रॉपर्टीची जंत्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवली. स्वत:चे १२ तोळे, पत्नीचे २० तोळे सोने अशी एकूण आतापर्यंत ४० कोटी ८७ लाख रूपयांचे बाजारमूल्याची प्रॉपर्टी दिसून आली आहे. खरातच्या अन्य प्रॉपर्टीची माहिती काढण्यात येत आहे. आयकर चोरी केली आहे का याचाही तपास सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
केवळ फोटो म्हणून आरोपी नाही
भास्कर जाधव यांनी यावेळी ज्या अधिका-यांनी त्याला संरक्षण दिले त्यांच्यावर कारवाई करा, राजकारण्यांचे फोटो त्याच्यासोबत आहेत त्यांची चौकशी करा अशी मागणी केली. त्यावर आपण सगळेच राजकारणात आहोत. कोणाबरोबर केवळ फोटो आहे म्हणून आरोपी करता येणार नाही. मात्र ज्याच्या विरोधात पुरावा मिळेल त्याला सोडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी न्यायाधीशामार्फत चौकशी करा अशी मागणी केली. त्यावर कायद्यानुसार न्यायालयाच्या अखत्यारित क्रिमिनल चौकशी करता येत नाही. न्यायालयच यावर स्वत: निर्णय घेऊ शकते असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

