28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रजरांगेंच्या सभेच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या

जरांगेंच्या सभेच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या

बीड : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याची घोषणा आजच्या बीड शहरातील इशारा सभेतून होणार आहे. त्यामुळे बीड शहरात कालपासून भगवेमय वातावरण पाहायला मिळत आहे. या सभेकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, मनोज जरांगेंच्या सभेच्या पूर्वसंध्येलाच बीड शहरातील एका व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. मधुकर खंडेराव शिंगण (वय ५० वर्षे) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे.

एकीकडे बीड शहरात मनोज जरांगे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू होती, तर दुसरीकडे शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये राहणा-या मधुकर शिंगण यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर आत्महत्या करण्यापूर्वी मयत मधुकर शिंगण यांनी एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, राम राम… मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मी मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत आहे.

मनोज जरांगे पाटील हे चांगलं काम करत आहेत. त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, अशा आशयाचा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. मधुकर शिंगण यांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

धाराशिव जिल्ह्यात देखील तरुणाची आत्महत्या…
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील गिरवली येथील अमरनाथ कदम या २४ वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अंजनसोंडा शिवारातील गट नंबर ५१ मधील स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR