Homeलातूरध्वनी प्रदूषणाविरुद्ध वाहतूक शाखेची कारवाई

ध्वनी प्रदूषणाविरुद्ध वाहतूक शाखेची कारवाई

लातूर : प्रतिनिधी
नागरिकांच्या आरोग्य, शांतता व सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने वाढत चाललेल्या ध्वनी प्रदूषणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांचे नेतृत्वात वाहतूक नियंत्रण शाखेकडून मागील महिन्यात मोहीम राबविण्यात आली होती. मोहिमेमध्ये वाहनांवर बसविण्यात आलेल्या बेकायदेशीर व कर्णकर्कश ध्वनी निर्माण करणा-या उपकरणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत सदर उपकरणे जप्त करण्यात आली होती. त्यामध्ये  हॉर्न, फटाका सायलेन्सर, टेप, लेझर लाईट असे ९ लाख १८ हजार रुपयाचे उपकरणाच्या समावेश होता. हे सर्व साहित्य वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नष्ट केले.
वाहतूक नियंत्रण शाखा, लातूर यांनी शहरातील विविध प्रमुख मार्ग, चौक व संवेदनशील भागांमध्ये वाहनांची तपासणी करून नियमबा  उपकरणे शोधून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई केली विशेषत: युवकांकडून वापरले जाणारे इंदुरी (फटाका) सायलेन्सर, मॉडिफाईड मफलर, उच्च क्षमतेचे साऊंड बॉक्स, कर्णकर्कश हार्न, एलईडी लाईट्स व टेप रेकॉर्डर यांचा समावेश या कारवाईत करण्यात आला.
या मोहिमेत एकूण १४९ बेकायदेशीर सायलेन्सर अंदाजे किंमत ७ लाख ४५ हजार रूपये, १९ साऊंड बॉक्स अंदाजे किंमत १ लाख ५२ हजार रूपये, ६ हॉर्न अंदाजे किंमत ३ हजार रूपये, २५ एलईडी लाईट्स अंदाजे किंमत ५ हजार रूपये, १३ टेप रेकॉर्डर अंदाजे किंमत १३ हजार रूपये, असा एकूण नऊ लाख अठरा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे नोंदवून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
जप्त केलेले साहित्य भविष्यात पुन्हा वापरात येऊ नये, तसेच नागरिकांना होणारा त्रास कायमस्वरूपी थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला. ते आज दिनांक ७ एप्रिल रोजी सर्व जप्त साहित्य नवीन रेणापूर नाका ते रेल्वे स्टेशन रोड येथील एच. पी. पेट्रोल पंपासमोरील सिमेंट रोडवर पोलीस अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, पंच तसेच छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत रोड रोलरच्या सहाय्याने सर्व साहित्य पूर्णत: निकामी करण्यात आले. ही प्रक्रिया संपूर्णपणे ‘इन-कॅमेरा’ नोंदविण्यात आली. यानंतर निकामी करण्यात आले. सदर स्क्रॅप विक्रीतून १६ हजार ५६० इतकी रक्कम प्राप्त झाली असून ती शासनाकडे अधिकृत चलनाद्वारे जमा करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR