नवी दिल्ली : महिला क्रिकेटच्या मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावरील हा पहिला कसोटी विजय आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१९ धावा आणि दुस-या डावात २६१ धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ४०६ धावा केल्यानंतर दुस-या डावात अवघ्या ७५ धावांचे टार्गेट २ गडी गमावून पूर्ण केले. स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग आणि स्रेह राणा यांनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली.
पहिल्या डावात २१९ धावा करून ऑस्ट्रेलियन संघ गडगडला. पहिल्या डावात ताहिलाने अर्धशतक झळकावले. दुस-या डावात २६१ धावा करून ऑस्ट्रेलियन संघ गडगडला. ताहिलाने दुस-या डावातही १७७ चेंडूंचा सामना करत ७३ धावा केल्या. या कालावधीत १० चौकार मारले. संघासाठी एलिस पेरीने ४५ धावांचे योगदान दिले.
भारताकडून पूजा वस्त्राकरने पहिल्या डावात ४ बळी घेतले. तिने १७ षटकांत ५३ धावा दिल्या. तर स्रेह राणाने २२.४ षटकांत ५६ धावा देत ३ बळी घेतले. दीप्ती शर्माने २ बळी घेतले. स्रेहने दुस-या डावात ४ बळी घेतले. तिने २२ षटकांत ६३ धावा दिल्या. राजेश्वर गायकवाड आणि हरमनप्रीतनेही प्रत्येकी दोन गडी बाद केले. पूजाला एक विकेट मिळाली.