26 C
Latur
Friday, November 29, 2024
Homeराष्ट्रीयशिक्षणासाठी कोटा शहर आणि मानसोपचार तज्ज्ञांची गरज!

शिक्षणासाठी कोटा शहर आणि मानसोपचार तज्ज्ञांची गरज!

२०२३ मध्ये २६ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडतेय

कोटा : ‘नीट’ परीक्षांची तयारी करणा-या २६ विद्यार्थ्यांनी यंदा आत्महत्या केल्यामुळे कोटा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले. यावर्षी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी आपले जीवन उमलत्या वयातच संपविले आहे. आपल्या घरापासून दूर राहून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी कोटात वैद्यकीय मानसोपचारतज्ज्ञांची मात्र कमतरता आहे.

राजस्थानात अभ्यासासाठी अनुकूल वातावरण असल्याने देशभरातील पालक आपल्या पाल्यांना राजस्थानातील कोटा, सिकर, जयपूर आदी शहरांत पाठवितात. राजस्थान सरकारच्या अर्थसंकल्पातील घोषणेमुळे यावर्षी सप्टेंबरमध्ये कोटातील न्यू मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये समुपदेशन केंद्र उभारण्यात आले. मात्र, या केंद्रात मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्ती केलेली नाही. या केंद्रासाठी पाच मानसोपचारतज्ज्ञांची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचा-यांचीही कमतरता आहे. राजस्थानातील वैद्यकीय महाविद्यालयांत मानसशास्त्रात एम.फिल करण्याची सोय नाही. त्यामुळे, ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. इतर राज्यांतील या विषयातील पदवीधारक राजस्थानात आहेत. मात्र, त्यांची संख्या खूपच अपुरी आहे.

न्यू मेडिकल कॉलेजच्या मानसशास्त्र विभागाचे डॉ. विनोदकुमार दारिया म्हणाले, की राजस्थानातील सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये वैद्यकीय मानसशास्त्रात एम.फिल अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करून गेल्या वर्षी जानेवारीत राज्य सरकारला पाठविला. त्यानंतर, कुशल मानसोपचारतज्ज्ञांसह समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, कोणत्याही अतिरिक्त अर्थसंकल्पी तरतुदीशिवाय हे केंद्र सुरू झाले असेही ते म्हणाले.

समुपदेशकांची तीव्र कमतरता
कोटातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी. एस. शेखावत यांनी कोटामध्ये तज्ज्ञ समुपदेशकांची तीव्र कमतरता असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, की मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशकांसाठी पत्रे लिहूनही त्यांची अद्याप नियुक्ती झालेली नाही. मानसोपचारतज्ज्ञ प्रशिक्षित असावा तसेच त्याच्याकडे पुरेसा अनुभव असायला हवा. यावर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झालेल्या समुपदेशन केंद्रात मी जवळपास ४०० रुग्णांचे व्यावसायिकरित्या समुपदेशन केले असून त्यातील बहुतेकजण विद्यार्थी आहेत.

खासगी क्षेत्रातही चारच मानसोपचारतज्ज्ञ
कोटातील सरकारी रुग्णालयांत मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशकांची उणीव असताना खासगी क्षेत्रातील चित्रही वेगळे नाही. कोटात अवघे तीन-चार खासगी मानसोपचारतज्ज्ञ असून त्यापैकी दोन मानसोपचारतज्ज्ञ शहरांतील प्रसिद्ध कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये काम करत आहेत. राजस्थानातील वैद्यकीय महाविद्यालयांत अजूनही एम. फिलचा अभ्यासक्रम सुरू झालेला नाही. त्याचप्रमाणे, वैद्यकीय मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्तीही प्रलंबित आहे. राजस्थानातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत मानसिक समस्यांनी त्रस्त रुग्णांची संख्या वैद्यकीय मानसशास्त्रात आठ जागांचा एम.फिलचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुरेशी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR